प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे नेहमी एक स्त्री असते. त्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या कामात ती त्याला अखंड साथ देत असते. ही सुंदर गोष्ट तितक्याच सुंदरपणे अनुष्का शर्मा आणि वरुण धवन अभिनीत 'सुई धागा- मेड इन इंडिया' या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. अनुष्का आणि वरुणचा हा सिनेमा २२ डिसेंबर २०१८ ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता हा सिनेमा 31 मार्च 2023 रोजी चीनमध्ये रिलीज होणार आहे.
'सुई धागा- मेड इन इंडिया'ची कथा होती ममता (अनुष्का शर्मा) आणि मौजी (वरुण धवन) यांची. विणकरांच्या कारागिरांच्या घरातील ही जोडी. आपल्या भोळ्या पण कुशल नवऱ्याचा त्याच्या मालकाकडून सतत होत असलेला पाणउतारा ममताला सहन होत नसते. मालकाची गुलामी करणारी नोकरी सोडून स्वतःचा शिवणकामाचा व्यवसाय सुरु करण्यासाठी ती मौजीला तयार करते. मौजीच्या आईला जेव्हा रुग्णालयात भरती करण्यात येते तेव्हा आपला व्यवसाय सुरु करण्यासाठीची संधी त्याच्याकडे चालून येते. एक साधी सुधी गृहिणी मौजीच्या सुई मधला धागा बनते आणि एकत्र मिळून त्याचे स्वप्न विणायला व उद्योजक बनण्याच्या त्याच्या इच्छापूर्तीला त्याला मदत करते.
निर्माता मनीष शर्मा म्हणाला, “एक फिल्म-मेकर म्हणून काही कथा या वैश्विक स्वरूपाच्या असतात आणि त्या भाषा तसेच भौगोलिक अंतर सहज पार करतात. माझ्याकरिता, सुई धागा- मेड इन इडिया ही अशीच एक कलाकृती आहे. ती भारतीय मूळं आणि मूल्यांशी रुजलेली प्रेमकथा आहे. भारतात प्रदर्शित झाल्यावर त्याला भरपूर प्रेम मिळालं आणि हे कथानक चीनमधील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल ही आशा मला वाटते. भारतीय तरुणाई स्वप्नांचा वेध घेणारी असून चीनमधील युवा पिढी अशीच आहे. मला चीनमधील प्रतिक्रिया पाहण्याची उत्सुकता स्वावलंबनामुळे लोक कशाप्रकारे आपली उदिष्टे गाठतात या संकल्पनेवर ते नक्कीच प्रेम करतील.”