‘सुईधागा’च्या निमित्ताने सोशल मीडियावर अनुष्का शर्मावरचे मीम्स, जोक्स जोरात आहेत. पण अनुष्काला विचाराल तर तिच्यावरचे हे सगळे मीम्स, विनोद तिच्या ‘सुईधागा’मधील कामाला मिळालेली पावती आहे. होय, आज लोकमतच्या व्यासपीठावर बोलताना अनुष्काला याबद्दल छेडले असता, तिने हे मीम्स अतिशय खिलाडूवृत्तीने घेतल्याचे दिसले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माझ्यावरच्या मीम्समुळे माझे काय कुणाचेचं नुकसान नाही. उलट फायदाचं आहे, यामुळे चित्रपटाबद्दल, ममताच्या व्यक्तिरेखेबद्दल लोकांची उत्सुकता वाढलीय आणि या उत्सुकतेपोटी लोक हा चित्रपट पाहतील, असे ती हसत हसत म्हणाली. ‘बँड बाजा बारात’ हा चित्रपट माझ्या करिअरमधील टर्निंग पॉर्इंट होता. यामुळे मला माझा फोकस कळला, असे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ती म्हणाली. महिलांना काय संदेश देशील, असे विचारले असता तिने आवर्जुन ‘सुईधागा’च्या ममता व मौजीचा उल्लेख केला. ममताशिवाय कुठलाही मौजी घडू शकत नाही. महिलांनी आपल्यातील शक्ती ओळखावी, स्वत:वर विश्वास ठेवावा, त्या काहीही करू शकतात, असे अनुष्का यावेळी म्हणाली.लोकमत तर्फे आज महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. स्व:कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या व समाजात परिवर्तन घडवून आणणा-या विविध क्षेत्रातील महिला उद्योजिकांचा सन्मान लोकमततर्फे करण्यात आला. जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमधील या सोहळ्याच्या व्यासपीठावर ‘ममता-मौजी’ अर्थात अनुष्का शर्मा व वरूण धवन यांनी हजेरी लावली.अनुष्का व वरूणचा ‘सुईधागा’ हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटात अनुष्काने ममताची तर वरूणने मौजीची भूमिका साकारली आहे. ममता व मौजी अनेक खस्ता खात स्वत:चा उद्योग उभा करतात.