पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डुबकीची जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. कारण, मोदींच्या या डुबकीनंतर लक्षद्वीप आणि तेथील निसर्गसौंदर्याची जगभरात चर्चा होत आहे. मोदींनी येथे पर्यटनाचा आनंद घेतला होता. तेव्हापासून लक्षद्वीप सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात ट्रेंड करत आहे. भारताचा शेजारी आणि चीनचा मित्र असलेल्या मालदीव सरकारला ही गोष्ट खटकल्याचं दिसून येत आहे. लक्षद्वीपमुळे मालदीव पर्यटनाला धोका पोहोचेल, म्हणून मालदीवची ट्रोलर्स आर्मी सक्रीय झाली. विशेष म्हणजे, मालदीवच्या सत्तारुढ पक्षाच्या नेत्याने भारतीयांवर घाणेरडी टीका केली. त्यानंतर, भारतीय सेलिब्रिटीही मैदानात उतरले आहेत.
बॉलिवूडचा खिलाडीकुमार अक्षय कुमार आणि भाईजान सलमान खानने ट्विट करुन लक्षद्वीपच्या सौंदर्याचं कौतुक केलंय. तसेच, लक्षद्वीप हे आपल्या भारतात असल्याचा अभिमान आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे. सुंदरतेत लक्षद्वीप मालदीवला टक्कर देत असल्याने तसेच कमी खर्चात भारतातच आनंद मिळत असल्याने भारतीय मालदीवला न जाता लक्षद्वीपला जायचे बोलू लागले आहेत. यावरून मालदीवच्या लोकांनी भारताविरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे. यावरून भारतीयांनीही बॉयकॉट मालदीव असे ट्रेंड केले आहे. त्याला आता, अक्षय कुमार आणि सलमान खानने जोरदार चपराक लगावली.
मालदीवमधील प्रमुख पक्षाच्या व्यक्तींनी भारतीयांबद्दल द्वेषपूर्ण आणि वर्णद्वेषी टिप्पण्या केली. ज्या देशाने मालदीवला जास्तीत जास्त पर्यटक पाठवले, त्या देशातील लोक असे करत आहेत याचे आश्चर्य वाटते. आपण आपल्या शेजाऱ्यांशी चांगले आहोत, पण आपण असा अनाठायी द्वेष का सहन करावा?, असा सवाल अक्षय कुमारने उपस्थित केला आहे. तसेच, भारतीय पर्यटनाला प्राधान्य देऊ असेही अक्षयने म्हटले.
मी मालदीवला अनेक वेळा भेट दिली आहे आणि नेहमीच त्याची प्रशंसा केली आहे, परंतु प्रथम सन्मान महत्त्वाचा. चला #ExploreIndianIslands चा निर्णय घेऊया आणि आपल्या स्वतःच्या भारताच्या पर्यटनाला पुढे देऊया, असे म्हणत अक्षय कुमारने भारतीय पर्यटनस्थळांना एक्पोलर करण्याचं आवाहन चाहत्यांना केलं आहे. तर, अक्षय कुमारच्या ट्विटनंतर बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यानेही ट्विट करुन लक्षद्वीप समुद्रकिनाऱ्याचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीचं कौतुक केलंय.
जाहीद रमीज यांनी केलं होतं ट्विट
मालदीवच्या सत्तारुढ पक्षाच्या नेत्याने भारतीयांसंदर्भाने घाणेरडी कमेंट केली आहे. प्रोग्रेसिव्ह पक्षाचे नेते जाहिद रमीज यांनी भारतीयांची खिल्ली उडविली आहे. जाहिद रमीझ याने पीएम मोदींच्या मालदीव भेटीचा व्हिडिओ रिट्विट केला आहे. 'चांगले पाऊल. मात्र, आमच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना भ्रामक आहे. आम्ही देत असलेली सेवा ते कशी देऊ शकतात? ते इतके स्वच्छ कसे असू शकतात? सर्वात मोठी समस्या खोल्यांमधील वास असेल, असे रमीझ याने म्हटले आहे.
दरम्यान, रमीझ यांच्या या ट्वीटनंतर मालदीवच्या ट्रोल आर्मीनेदेखील ट्वीट करण्यास सुरुवात केली. त्यामुळे चिडलेल्या भारतीयांनीही मालदीववर हल्ला सुरु केला. यानंतर मालदीववर बहिष्कार घालण्याचा ट्रेंड सुरु झाला. आता, भआरतीय सेलिब्रिटींनीही यात उडी घेतल्याने मालदीवला चांगलाच पश्चाताप होणार आहे.