आपल्या संगीताने अख्ख्या जगाला वेड लावणारा संगीताचा जादूगार ए.आर. रहमान याला स्टेजवर गमतीगमतीत केलेले एक कृत्य चांगलेच महागात पडले. यानंतर रहमानला लोकांनी जबरदस्त ट्रोल केले. आता ही काय भानगड आहे, ते जाणून घेऊ यात.तर इव्हेंट होता रहमानच्या ‘99 Songs’ या आगामी सिनेमाच्या ऑडिओ लॉन्चचा. या सोहळ्याला सिनेमाचा लीड अभिनेता एहान भट व एआर दोघे हजर होते.
सोहळा सुरु झाला आणि अँकरने तामिळमध्ये रहमानचे स्वागत केले. एहानचे स्वागत मात्र त्याने हिंदीमध्ये केले. हे पाहून रहमान लगेच रिअॅक्ट झाला. हिंदी? असे म्हणून रहमान स्टेजवरून खाली उतरला आणि सोहळा सोडून जाऊ लागला. ‘मी तुला (अँकरला) आधीच तामिळमध्ये बोलणार की नाही,असे विचारले नव्हते?’, असे जाता रहमान म्हणाला. यावर मी केवळ ऐहानला खूश करण्यासाठी हिंदीत बोललो, असे स्पष्टीकरण अँकर करू लागला. पण यानंतर लगेच रहमान हसू लागला. अरे मी नुसती तुझी फिरकी घेत होतो, असे त्याने स्पष्ट केले.
अर्थात रहमानचा हा विनोदी अंदाज सोशल मीडिया युजर्सला आवडला नाही. त्यांनी यावरून रहमानला ट्रोल करणे सुरु केले. अनेकांनी तर रहमानचे हे कृत्य हिंदी भाषेचा अपमान असल्याचे म्हटले. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, असे अनेक युजर्सनी त्याला सुनावले. काही युजर्सनी तर चक्क रहमानला देशद्रोही ठरवले.रहमानच्या ‘99 Songs’ या सिनेमाबद्दल सांगायचे तर विश्वेश कृष्णामूर्तींनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. एहान भटसोबत अमेरिकन अभिनेत्री एडिसली वर्गेस यात लीड रोलमध्ये दिसणार आहे. येत्या 16 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होतोय.