Join us

‘क्वीन ऑफ कॅब्रे’ अभिनेत्री आरती दास यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 10:19 AM

सुप्रसिद्ध नृत्यांगणा व अभिनेत्री आरती दास यांचे निधन झाले. त्या 76 वर्षांच्या होत्या.

ठळक मुद्देआरती दास यांचा  60 व 70 च्या दशकात मोठा बोलबाला होता.

सुप्रसिद्ध नृत्यांगणा व अभिनेत्री आरती दास यांचे निधन झाले. त्या 76 वर्षांच्या होत्या. बंगाली चित्रपटसृष्टीत आरती दास यांचे मोठे नाव होते. त्या ‘मिस शेफाली’ नावाने ओळखल्या जात. गुरूवारी पश्चिम बंगालच्या नॉर्थ 24 परगनास्थित राहत्या घरी त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या किडनीच्या आजाराने ग्रस्त होत्या.त्याची पुतणी एल्विन शेफाली हिने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. यानंतर त्यांना रूग्णालयात हलवण्यात आले. येथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

आरती दास यांचा  60 व 70 च्या दशकात मोठा बोलबाला होता. दिग्गज दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्या प्रतिद्वंदी व सीमाबद्ध अशा सिनेमात त्यांनी काम केले. फिल्म इंडस्ट्रीत ‘क्वीन ऑफ कॅब्रे’ नावाने त्या प्रसिद्ध होत्या.

आरती यांनी 1968 साली प्रदर्शित ‘चौरंगी’ या सिनेमाद्वारे करिअरला सुरुवात केली. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. चित्रपटांसोबत अनेक नाटकांतही काम केले.2015 मध्ये आरती दास यांची बायोग्राफी प्रकाशित झाली होती.

ममता बॅनर्जींनी व्यक्त केले दु:खआरती दास यांच्या निधनावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दु:ख व्यक्त केले.