बॉलिवूडमधील चर्चेतल्या घटस्फोटांपैकी एक म्हणजे अरबाज खान (Arbaaz Khan) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) यांचा घटस्फोट. दोघांना वेगळं होऊन जवळपास ६ वर्ष झाली आहेत. मात्र आजही मलायकाला त्यावरुन सतत लक्ष केलं जातं. घटस्फोटानंतरही त्यांचं बॉंडिंग तसं खास आहे. दोघंही मुलासोबत एकत्र दिसतात. सध्या दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. मात्र त्यांना ट्रोल करण्याची एकही संधी नेटकरी सोडत नाही. यावरुन आता अरबाज खानने असं उत्तर दिलं आहे जे ऐकून ट्रोलर्सचीही बोलती बंद झाली आहे.
अरबाजने एका मुलाखतीत मलायकाला केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगवर उत्तर दिलं आहे. तो म्हणाला, 'लोकं काहीही बोलू शकतात आणि खरं सांगायचं तर त्यांना उत्तरं देण्याचा आम्ही विचारच करत नाही. आमच्याबद्दल लोकं काय विचार करतात याच्याशी आम्हाला फरकच पडत नाही. एखादा माणूस त्याच्या पूर्वपत्नीसोबत बोलू शकत नाही का यात नवल वाटण्यासारखं काय आहे.'
अरबाज पुढे म्हणाला, 'आमचा मुलगा अरहानचे करिअर, त्याचं भविष्य यासंदर्भात नेहमीच आम्ही एकमेकांशी बोलतो. अनेक वेळा जेव्हा अरहानचा फोन लागत नाही किंवा त्याच्याशी बोलणं होत नाही तेव्हा मी सरळ मलायकाला फोन लावतो. खरं सांगायचं तर मला नाही वाटत की आपल्या मुलासाठी आधीच्या पत्नीला भेटणं, तिच्याशी बोलणं यात काही गैर आहे. लोकं भोळी आहेत त्यांना हे नाही माहित की आमच्या कुटुंबात नेमकं काय सुरु आहे. त्यांना जे बाहेरुन दिसतं त्यावरच ते प्रतिक्रिया देतात.'
मलायका आणि अरबाज घटस्फोटानंतर अनेकदा मुलासोबत एकत्र दिसले आहेत. नुकतेच ते मुंबई विमानतळावर सोबत आले होते. तर दुसरीकडे मलायका अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) रिलेशनशिपमध्ये आहे. मलायका अर्जुनपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. त्यांच्यातील या अंतरामुळे नेहमीच त्यांना ट्रोल केले जात आहे.