Join us

 अर्चना पूरण सिंहच्या मुलांना काम मिळेना..; म्हणाली, स्टारकिड्स असूनही माझ्या मुलांना...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 11:35 AM

Archana Puran Singh : सध्या अर्चना मुलांच्या काळजीने व्यथित आहे. आपल्या मुलाला मनासारखं काम मिळत नसल्याची खंत तिनं बोलून दाखवली आहे.

ठळक मुद्देकरिअरच्या सुरुवातीच्या काळात अर्चनाने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. ‘बँड ऐड’ची तिची जाहिरात बघूनच तिला ‘मिस्टर अँड मिसेज’ टीव्ही मालिका मिळाली.

बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे अर्चना पूरण सिंह (Archana Puran Singh). उत्तम अभिनय आणि विनोदशैलीच्या जोरावर या अभिनेत्रीनं आज प्रेक्षकांच्या मनात एक स्वतंत्र जागा निर्माण केली आहे. पण सध्या अर्चना काहीशी व्यथित आहे. आपल्या मुलाला मनासारखं काम मिळत नसल्याची खंत तिनं बोलून दाखवली आहे.

अर्चना व तिचा पती परमीत सेठी गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत अ‍ॅक्टिव्ह आहेत. आईबाबाच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मोठा मुलगा आर्यमान हाही इंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. पण त्याला चांगलं काम मिळत नाहीये. आर्यमनने आत्तापर्यंत अनेक ऑडिशन दिल्या. पण अद्याप त्याला मनासारखी भूमिका मिळालेली नाही.अर्चनाने ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत याबाबत सांगितलं. माझी दोन्ही मुलं वडिलांसारखे अ‍ॅक्टर बनू इच्छितात. दोघेही ऑडिशन देत आहेत. मला माझ्या मुलांचा अभिमान आहे. कारण दोघांनाही स्वबळावर इंडस्ट्रीत काम मिळवायचे आहे. स्टारकिड्स असूनही माझ्या दोन्ही मुलांना कोणतीही विशेष वागणूक मिळालेली नाही. ते कष्ट घेत आहेत, प्रयत्न करत आहेत. माझा मोठा मुलगा आर्यमनने कित्येक ऑडिशन दिल्या. पण अद्याप त्याला मनासारखं काम मिळालेलं नाही.

अ‍ॅक्टर्सच्या मुला-मुलींना सहजपणे काम मिळतं. पण आमच्या बाबतीत असं काहीही नाही. आमची मुलं मेहनत घेत आहेत. कुठलीही स्पेशल ट्रिटमेंट नसताना त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि मला आशा आहे, ते लवकरच आपला फिल्मी प्रवास सुरू करतील, असं अर्चना म्हणाली.अर्चनाने अभिनेता आदित्य पांचोलीसोबत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर नसीरूद्दीन शहा यांच्यासोबत ‘जलवा’ चित्रपटात ती झळकली. हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता. अग्निपथ, सौदागर, शोला और शबनम, आशिक आवारा, राजा हिंदुस्तानी अशा अनेक चित्रपटांत काम केले.

करिअरच्या सुरुवातीच्या काळात अर्चनाने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. ‘बँड ऐड’ची तिची जाहिरात बघूनच तिला ‘मिस्टर अँड मिसेज’ टीव्ही मालिका मिळाली. 1985 मध्ये आलेली दिग्दर्शक पंकज पाराशर यांची ‘करमचंद’ ही मालिका अर्चनाच्या करिअरमधील मोठा ब्रेक ठरली. त्यानंतर तिने अनेक मालिका, शोजमध्ये अभिनेत्री आणि प्रेझेंटर म्हणून काम केले.अर्चनाचे पहिले लग्न अपयशी ठरले होते. यामुळे अर्चनाने पुन्हा कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. पण जेव्हा परमीत तिच्या आयुष्यात आला आणि सगळेच बदलले. परमीत व अर्चना लग्नापूर्वी चार वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचेही कुटुंबीय या नात्यामुळे खुश नव्हते. पण अर्चना व परमीत यांचे प्रेम सच्चे होते. चार वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर अखेर 30 जून 1992 रोजी त्यांनी लग्न केले.

टॅग्स :अर्चना पूरण सिंग