आपल्या सुंदर आवजाने सर्वांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये त्याच्या आवजाची जादू पाहायला मिळाली. अरिजीतची गणना बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी गायकांमध्ये केली जाते. पण एकदा अरिजीत सिंग हा इला अरुण यांच्यासमोर ढसढसा रडू लागला होता. काय आहे तो किस्सा? घ्या जाणून…
प्रसिद्ध गायिका ईला अरुण या अरिजीतवर खूप भडकल्या होत्या. त्यावेळी त्याला खूप रडू कोसळलं होतं. या दोघांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, अरिजीत त्यांच्याजवळ जातो आणि म्हणतो, “प्लीज मॅम, मला तुमच्या पायांना स्पर्श करू द्या. मी तुमचा खूप आदर करतो. त्यावर ईला म्हणतात, पायांना स्पर्श करण्यालायक मी राहिले नाही. एखाद्या व्यक्तीच्या पायांना तेव्हाच स्पर्श केला जातो, जेव्हा त्याच्याविषयी मनात खूप आदर असतो.
हे ऐकून अरिजीत म्हणतो, 'मॅम, तुम्ही असं का करत आहात? तुम्ही मला पायांना स्पर्श करू देत नाही आहात. तुमच्याशी बोलू देत नाही आहात. जर तुम्ही माझ्याशी असं वागलात तर मी वेडा होईन. मी सर्वांत जास्त तुमचा आदर कर'. या व्हिडीओत ईला अरुण पुढे म्हणतात, 'मला वाईट वाटून घेण्याचा अधिकार नाही का? एखादा कलाकार गाणं सुरात गात असेल पण खासगी आयुष्यात तो बेसूर असेल तर मला हे सहन होत नाही'.
व्हिडीओमध्ये दिसते की, पुढे ईला या अरजिताला विचारतात, 'तुला नात्यांचं काही महत्त्व आहे की नाही? विचार कर. मी तुझ्यासाठी फक्त एक शिक्षक आहे तर? तुझं आणि माझं खुर्चीशिवाय काही नातं होतं का? मोठा व्यक्ती होशील तेव्हा नाती बाजूला ठेवशील? जावेद भाई म्हणाले त्याच्याशी छान बोला. तो एक दिवस स्टार झाला तर विचारणार नाही. पण, जर तू चांगला व्यक्ती बनला नाहीस तर कितीही चांगला गायक असला तरी खालीच पडशील. त्यामुळे अशी प्रतिमा बनवू नकोस की लोक म्हणतील अरजित फक्त चांगले गातो पण, नात्यात तो कच्चा आहे'. या व्हिडीओमध्ये अरजित ढसढसा रडताना दिसत आहे.