Join us

अरिजीतचा साधेपणा! हातात पिशवी घेऊन गल्लीत फेरफटका, शेजाऱ्यांशी गप्पा; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 12:36 PM

गायक अरिजीत सिंगचा साधेपणा पाहून चाहते पुन्हा भारावून गेले आहेत.

'तुम ही हो', 'मस्त मगन', 'मनवा लागे', यांसारखी अनेक हिट गाणी गाणारा बॉलिवूड सिंगर अरिजीत सिंह (Arijit Singh) याची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही.  2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी 2’मधील तुम ही हो, चाहू मैं या ना या गाण्यांमुळे अरिजीत तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनला.  याशिवाय अरिजीतचा साधेपणा ही त्याची जमेची बाजू आहे. त्याच्या स्वभावामुळे त्याने करोडो लोकांचं मन जिंकलं आहे. त्याचा साधेपणा दाखवणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

गायक अरिजीत सिंहचा एक जुना व्हिडिओ सध्या फेसबुकवर फिरत आहे. शॉपिंग केल्यावर हातात पिशवी घेऊन आपल्या गाडीकडे जातानाचा त्याचा हा व्हिडिओ आहे. बाईक सुरु करतानाच तो शेजाऱ्यांशी बंगाली भाषेत गप्पाही मारताना दिसतोय. कॅज्युअल टीशर्ट, पँट घालून तो बाहेर पडला आहे.  इतक्या प्रसिद्ध गायकाचा हा साधा व्हिडिओ पाहून लोकांना तर विश्वासच बसत नाही. त्यामुळे व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट्सचा भडिमार होतोय.

आपल्या आवडीच्या गायकाचा हा नम्र स्वभाव पाहून चाहते खूश झालेत. अनेक लोक हे अरिजीतच्या गाण्यांचे नाही तर एक माणूस म्हणूनही त्याचे चाहते आहेत. आयपीएल 2023 च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये अरिजीत सिंहने परफॉर्म केले होते. यावेळी तो भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या पाया पडताना दिसला होता. त्याने केलेली ही कृती पाहून तर चाहते भारावले होते. तो व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता.

अरिजीत सिंह पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादचा आहे. आई बंगाली होती तर वडील शीख आहेत. कोरोना आला तेव्हा लॉकडाऊनवेळी तो पुन्हा आपल्या गावी जाऊन राहिला होताय. तो केवळ तिकडे शिफ्ट झाला नाही तर त्याने पगडी घालायलाही सुरुवात केली. 

टॅग्स :अरिजीत सिंहपश्चिम बंगालबॉलिवूड