अभिनेता अर्जुन कपूरचा नुकताच 'नमस्ते इंग्लंड' हा सिनेमा प्रदर्शित झाला. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकला नाही. आता अर्जुन कपूर लवकरच 'इंडियाज मोस्ट वान्टेड' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच त्याने पूर्ण केले आहे. हा सिनेमा देशभक्तीपर असल्याचे अर्जुनने सांगितले.
अर्जुन कपूर 'इंडियाज मोस्ट वान्टेड' चित्रपटात गुप्त अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने याबाबत सांगितले की, 'ही अतिशय भीतीदायक आणि वास्तविक कथा आहे. हा चित्रपट केल्यानंतर मी भारतीय असल्याचा मला अभिमान वाटतो आहे. या चित्रपटामुळे तुमच्या मनात देशभक्ती नक्की जागृत होईल. ही अशा नायकाची कथा आहे ज्याच्या शौर्याचे वर्णन अजूनपर्यंत झालेले नाही. अशा हिरोंचा सन्मान आणि प्रशंसा व्हायला हवी.'या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता यांनी केले असून हा सिनेमा २४ मे, २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
'इंडियाज मोस्ट वान्टेड'चे सर्वात जास्त चित्रीकरण हे पटणा शहरामध्ये झाले आहे. पटणामध्ये चित्रीकरण करणाऱ्या अभिनेत्यांपैकी मी पण एक आहे याचा मला अभिमान आहे, असे अर्जुनने सांगितलं. बिहारमध्ये चित्रीकरण करण्यासाठी बरेच कलाकार असुरक्षित समजतात. मात्र मला अजिबात असे वाटत नाही. या ठिकाणी मला खूप प्रेम मिळाले. तिथली संस्कृती खूपच चांगली आहे. इथे चित्रीकरण झाल्यानंतर मी माझ्यातील नकारात्मकता बदलू शकलो तर मला नक्की आनंद होईल. इतर कलाकारदेखील बिहार आणि पटणामध्ये चित्रीकरणासाठी येतील अशी मला आशा आहे, अशी भावना अर्जुनने व्यक्त केली. अर्जुनला गुप्त अधिकाऱ्याच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.