अभिनेता अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) जबरदस्त कमबॅक केलं आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या 'सिंघम अगेन' सिनेमात अर्जुन कपूरने 'डेंजर लंका' ऊर्फ जुबैर हाफीजची भूमिका साकारली आहे. अर्जुनच्या या खलनायकी भूमिकेचं खूप कौतुक होतंय. बऱ्याच काळानंतर अर्जुनचं एखाद्या भूमिकेसाठी कौतुक होतंय. यामुळे अर्जुनने सर्वांचे आभार मानलेत. दरम्यान नुकतंच एका मुलाखतीत त्याने आयुष्यात सध्या आलेल्या एकाकीपणावर भाष्य केलं.
अर्जुन कपूर १२ वर्ष मोठ्या मलायका अरोरासोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र त्यांचं ब्रेकअप झालं असून मी सिंगल आहे असा नुकताच अर्जुनने खुलासा केला होता. तर आता हॉलिवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आयुष्यातील एकटेपणाविषयी तो म्हणाला, "२०१४ मध्ये एकटेपणावर बोललो होतो. आईचं निधन झालं आणि माझी बहीण दिल्लीत शिकत होती. मी सिनेमाच्या कामानिमित्त प्रवास करत होतो. या सगळ्यात घर रिकामं होतं. त्यामुळे तुम्हाला खूप गर्दीतही एकटं वाटू शकतं. हे सगळं मी वयाच्या २६-२७ व्या वर्षी अनुभवत होतो. त्यात मी एक स्टार म्हणूनही सिनेमात आलो होतो. मला एवढं अटेन्शन मिळत होतं. पण तरी मी माझं वैयक्तिक आयुष्य बॅलन्स केलं होतं."
तो पुढे म्हणाला, "आज आयुष्यातील या टप्पायवर मला स्वत:ची काळजी घ्यायची आहे. गेल्या काही वर्षात प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यात जे जे घडलंय त्यामुळे मी डिस्टर्ब होतो. त्यामुळे आता मला फक्त माझाच विचार करायचा आहे. रिलेशनशिपमध्ये चढ उतार येतच असतात. जर ते नाही वर्क आऊट झालं तर त्याचाही स्वीकार केला पाहिजे. आज आयुष्यात आधीसारखा एकटेपणा तर नाहीये पण मी रोज स्वत:ला आणखी चांगला होण्यासाठी मदत करत आहे."