अर्जुन कपूर हा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता आहे. 'इशकजादे' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अर्जुनला अभिनय क्षेत्रात फार चांगली कामगिरी करता आली नाही. अनेक सुपरहिट सिनेमे देऊनही प्रेक्षकांवर छाप पाडण्यात आणि प्रसिद्धी मिळवण्यात अर्जुनला यश मिळालं नाही. बॉलिवूडमधील करिअरपेक्षा अर्जुन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेला अर्जुन आईच्या आठवणीत भावुक झाला आहे.
अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या 'इशकजादे' सिनेमातून पदार्पण केलं होतं. पण, त्याचा पहिला चित्रपट पाहण्यापूर्वीच त्याच्या आईने या जगाचा निरोप घेतला होता. अर्जुनची आई मोना कपूर यांचं २५ मार्च २०१२ साली निधन झालं. आज त्यांना जाऊन १२ वर्षे झाली आहेत. आईच्या आठवणीत भावुक झालेल्या अर्जुन कपूरने पोस्ट शेअर केली आहे. अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन आई आणि बहिणीबरोबरचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने भावुक पोस्ट लिहिली आहे.
"वेळ निघून जाते, असं लोक म्हणतात...पण, हे खरं नाही. १२ वर्ष झाली आणि आजही हा दिवस मला आवडत नाही. तुझ्याबरोबर आता फोटो काढता येणार नाही हे फिलिंग आणि सत्य मला आवडत नाही. मला आई बोलता येणार नाही, याचा द्वेष येतो. माझ्या फोनवर आईचा कॉल येणार नाही...तुला आमच्यापासून हिरावून नेलं...याचा तिरस्कार येतो. मी ठीक आहे, हे दाखवण्याव्यतिरिक्त माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे...पण, माझं आयुष्य तुझ्याविना अपूर्ण आहे. मी तुला खूप मिस करतो. तू आम्हाला सोडून गेली नसतीस तर गोष्टी वेगळ्या असत्या. मी वेगळा असतो. कदाचित माझ्या मी जास्त आनंदी असतो. तू जिथे कुठे असशील तिथे हसत राहा...कारण, तुझ्याशिवाय हसणं आणि जगणं मला कठीण जात आहे..." असं म्हणत अर्जुनने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अर्जुन हा बोनी कपूर आणि मोना कपूर यांचा मुलगा आहे. बोनी कपूर यांनी १९८३ साली मोना कपूर यांच्याशी लग्न केलं होतं. पण, लग्नानंतर १६ वर्षांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले. मोना कपूर यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी दुसरा विवाह केला होता. जान्हवी आणि खुशी कपूर या श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या मुली आहेत.