Join us  

दोन बायका, फजिती ऐका, नावात साधर्म्य असल्यानं बॉलिवूडच्या सिंगरला बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 3:35 PM

Armaan malik: गेल्या काही दिवसांपासून अरमान मलिकला त्याच्या याच नावाचा फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे.

संगीत विश्वातील बहुचर्चित असलेलं नाव म्हणजे अरमान मलिक (armaan malik). आपल्या सुमधूर आवाजाच्या जोरावर अरमानने बॉलिवूडवर आणि श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. केवळ देशातच नव्हे तर विदेशातही अरमानचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.  परंतु, गेल्या काही दिवसांपासून अरमान मलिकला त्याच्या याच नावाचा फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यामागे दोन पत्नीमुळे चर्चेत येणारा युट्यूबर अरमान मलिक जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे.

युट्यूबवर सध्या अरमान मलिक हे नाव चांगलंच ट्रेंडिंग होत आहे. आपल्या दोन पत्नींसोबत डेली व्लॉग्स, फिटनेस व्हिडीओ केल्यामुळे अरमान चर्चेत येत असतो. मात्र, त्याच्या याच नावामुळे गायक अरमान मलिकला फटका बसत आहे. त्यामुळेच गायक अरमानने एक ट्विट करुन याविषयी भाष्य केलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

युट्यूबर अरमान मलिक याचं खरं नाव संदीप असं असून तो सोशल मीडियावर अरमान मलिक या नावाने वावरतो. त्यामुळे बऱ्याचदा नेटकऱ्यांनी अरमान मलिक हे नाव सर्च केल्यानंतर गायक अरमान मलिक याच्याविषयीचे अपडेट येण्याऐवजी दोन पत्नी असलेल्या अरमानचे डेली व्लॉग्स चाहत्यांसमोर येतात. ज्यामुळे बॉलिवूड सिंगरने याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

गायक अरमान मलिकचं ट्विट 

"त्यांना अरमान मलिक म्हणणं प्रथम बंद करा. त्यांचं खरं नाव संदीप आहे. कृपा करुन माझ्या नावाचा गैरवापर करणं बंद करा. सकाळी उठल्यापासून माझ्या नावाचे हे चुकीचे आर्टिकल्स पाहून मला संताप येऊ लागलाय आणि या वृत्तांमुळे तर घृणा वाटू लागली आहे", असं ट्विट अरमान मलिकने केलं आहे.

 

दरम्यान, गायक अरमान मलिकचं हे ट्विट पाहिल्यानंतर काहींनी त्याला पाठिंबा दिला आहे. बरोबर आहे. 'मी कधीही तुझ्याविषयी सर्च केलं की मला या दोन पत्नी असलेल्या अरमानविषयीचीच माहिती दिसून येते. मी सुद्धा या सगळ्याला कंटाळलो आहे', असं एका युजरने म्हटलं आहे. तर, 'आम्हाला सुद्धा त्याचे व्हिडीओ पाहुन कंटाळा आलाय', असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

युट्यूबर अरमान मलिकने दिलं प्रत्युत्तर

गायकाने केलेलं ट्विट पाहिल्यानंतर युट्युबरने एक व्हिडीओ पोस्ट करत त्याचं प्रत्युत्तर दिलं आहे. "कदाचित या मुद्द्यावरुन मोठा वाद निर्माण होऊ शकतो. पण, आम्ही आमच्या जागीच योग्य आहेत. एकाच नावाचे करोडो लोक असतात. आणि, जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या नावावरुन मी माझं नाव ठेवलं. तर, तुम्हाला सांगतो मी तुमच्यापेक्षा ५ वर्षांनी मोठा आहे.  लहानपणापासून मला घरात संदीप आणि अरमान या दोन नावाने बोलावलं जातं. आणि, सगळ्यात महत्त्वाचं एखादी व्यक्ती ट्विट करुन मला किळस वाटते असं म्हणतो हे ऐकून वाईट वाटलं."

 

टॅग्स :अरमान मलिकसेलिब्रिटीबॉलिवूड