बॉलिवूडचा अभिनेता चंकी पांडेच्या वाढदिवसाला प्रेमाची कबुली देणारी घराघरात पाहिल्या जाणाऱ्या मालिकांची 'राणी' एकता कपूर संकटात सापडली आहे. बिहारच्या न्यायालयाने तिच्यासह तिची आई शोभा कपूरविरोधात अटक वॉरंट जारी केले आहेत. वेब सिरीजचे हे प्रकरण असून त्यात सैनिकांच्या पत्नीचे पात्र आक्षेपार्ह पद्धतीने दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बेगुसरायचे न्यायदंडाधिकारी विकास कुमार यांच्या न्यायालयाने हा वॉरंट काढला आहे. ६ जून २०२० ला माजी सैनिक शंभू कुमार यांनी सीजीएम कोर्टात तक्रार दाखल केली होती. एकता कपूरच्या ट्रिपल एक्स वेबसीरीजच्या सिझन २ मध्ये सैनिकांच्या पत्नींवर आक्षेपार्ह सीन दाखविण्यात आले होते. सैन्याचे जवान जेव्हा देशसेवेत असतात तेव्हा त्यांच्या पत्नी घरात परपुरुषांसोबत असतात, असे दाखविण्यात आले आहे.
यावरून माजी सैनिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यामुळे या माजी सैनिकाने न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी फेब्रुवारी २०२१ मध्ये एकता कपूर आणि शोभा कपूरला हजर राहून उत्तर देण्याचा समन्स जारी करण्यात आला होता. एकता कपूरच्या ऑफिसमध्ये हा समन्स पाठविण्यात आला होता.
माजी सैनिकांच्या वतीने न्यायालयात तक्रार पत्र दाखल करून आक्षेप घेण्यात आल्याचे या खटल्यातील बाजू मांडणाऱ्या वकिलांनी याची माहिती दिली आहे. आता न्यायालयाने एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहेत. अधिवक्ता हृषिकेश पाठक यांनी सांगितले की, 524/C 2020 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.