अर्शद वारसीने आज हिंदी चित्रपटसृष्टीत त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. १९९६ साली प्रदर्शित झालेल्या तेरे मेरे सपने ह्या चित्रपटाद्वारे त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तो सहकलाकाराच्या भूमिकेत झळकला होता. त्याआधी आग से खेलेंगे या चित्रपटात केवळ एका गाण्यात तो झळकला होता. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातील मेरे दो अनमोल रतन, हिरो हिंदुस्थानी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याला खऱ्या अर्थाने ओळख मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटामुळे मिळाली. या चित्रपटातील त्याची सर्किटची भूमिका चांगलीच गाजली. त्याने त्यानंतर लगे रहो मुन्नाभाई, गोलमाल, हलचल, सलाम नमस्ते यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
आपल्या अप्रतिम अभिनयाने रुपेरी पडद्यासोबतच छोटा पडदा गाजवल्यानंतर अर्शद वारसी आता वूट ओरिजिनल्सच्या असूरा या वेब सीरिजमधून डिजिटल जगात पदार्पण करणार आहे.
प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या सायकॉलॉजिकल थ्रिलरमध्ये अर्शद डॉ. धनंजय ही चलाख आणि काहीशी विचित्र माणसाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. मोठ्या पडद्यावर विनोदाचे उत्तम टायमिंग साधत या कलाकाराने आपले एक अढळ स्थान निर्माण केले. आता त्याचे हे वेगळे, नाट्यमय रुप प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. या त्याच्या भूमिकेविषयी आणि या नव्या क्षेत्रात पदार्पण करण्याविषयी अर्शद सांगतो, "भारतात सध्या ओटीटी व्यासपीठांचे भवितव्य उज्ज्वल आहे. डिजिटल जगात सर्जनशील पटकथांना, नव्या कथांना वाव आहे. त्यामुळे या जगाचा भाग होणे ही मोठी संधी आहे. यातून अभिनेत्यांना आपल्या भूमिकांमध्ये प्रयोग करून पाहण्याची, आपली क्षितीजे विस्तारण्याची संधी मिळते. मी साकारत असलेला धनजंय हा अतिशय समंजस, हुशार आहे. प्रत्येक गोष्ट ही परफेक्टच झाली पाहिजे असे मानणारा तो आहे. या व्यक्तिरेखेवर सध्या मी चांगलीच मेहनत घेत आहे. सुरुवातीला दिग्दर्शकासोबत चर्चा करून मी माझी व्यक्तिरेखा पूर्णपणे समजून घेतली. त्यानंतर बराच काळ चर्चा केल्यानंतर प्रत्येक दृश्यातून, दिसणाऱ्या फ्रेममधून त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे, हे देखील समजून घेतले. या कार्यक्रमाची टीम भन्नाट आहे आणि 'असूरा'चा भाग असणे हे खरंच खूप छान आहे. "