गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अंबानी कुटुंबाच्या प्री वेडिंग सोहळ्याची चर्चा होती. १ ते ३ मार्च दरम्यान या सोहळ्याचा जल्लोष पाहायला मिळाला. बॉलिवूड, हॉलिवूड, उद्योग आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी सोहळ्याला हजेरी लावली. या शाही सोहळ्याची सजावट तर डोळे दिपवणारी होती. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची मुलगी इव्हांका ट्रंपनेही (Ivanka Trump) सोहळ्याला हजेरी लावली. दरम्यान तिच्या एका फोटोवर अभिनेता अरशद वारसीची पत्नी मारिया गोरेट्टीने (Maria Goretti) नाराजी दर्शवली आहे.
जामनगर येथे झालेल्या अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्यासाठी आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसंच पाहुण्यांसाठी व्हीआयपी ट्रीटमेंट, लॅव्हिश सोयी सुविधा होत्या. डोनाल्ड ट्रंप यांची मुलगी इव्हांका ट्रंपनेही सोहळ्यात लक्ष वेधून घेतले. तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यावर अरशद वारसीच्या पत्नीने आक्षेप घेतला आहे. इव्हांकाने हत्तीजवळ उभं राहून फोटो काढला आहे. हा फोटो अरशद वारसीची पत्नी मारियाने नाराजी व्यक्त केली आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत लिहिले, 'अंबानी कुटुंबाच्या सोहळ्यातील हा फोटो पाहून मला आश्चर्च वाटलं. असं कोणत्याही प्राण्यासोबत करु नये. विशेषकरुन ते प्राणी ज्यांची सुटका करुन त्यांचा सांभाळ केला जात आहे. हा फोटो पाहून खूप दु:ख झालं. एका हत्तीला लोकांच्या गर्दीत शोभेसारखं उभं केलं आहे.'
विशेष म्हणजे या सोहळ्याच्या निमित्ताने अनंत अंबानी यांनी सुरु केलेल्या 'वनतारा' प्रकल्पाचीही झलक सर्वांना दाखवण्यात आली. या प्रकल्पांतर्गत अनेक प्राण्यांना रेस्क्यू करण्यात आले असून त्यांचं पुनवर्सन केलं जात आहे. जामनगरमध्ये कित्येक एकरावर हा प्रकल्प प्रस्थापित करण्यात आला आहे.