Join us

बॉलिवूड कलाकारांनी कलम ३७० कलम अंशत: हटवण्याबाबत दिल्या अशा प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 2:28 PM

Bollywood Reaction on Scrapping of Article 370: मोदी सरकारच्या या निर्णयासाठी बॉलिवूडमधील मंडळींनी सोशल मीडियाद्वारे त्यांचे स्वागत केले आहे.

ठळक मुद्देकाश्मीर प्रश्नावर आता खऱ्या अर्थाने तोडगा निघेल असे अनुपम खेरने ट्वीट करत लिहिले आहे. लवकरच काहीतरी घडेल असे जायरा वसीमने ट्वीट करत म्हटले आहे तर काश्मीरमधील लोकांनी आपली काळजी घ्यावी असे आव्हान संजय सुरीने लोकांना केले आहे.

गेली अनेक दशकं चर्चेचा, वादाचा विषय ठरलेलं, जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं राज्यघटनेतील 'कलम 370' रद्द करण्याची, त्यातील काही वादग्रस्त तरतुदी वगळण्याची ऐतिहासिक शिफारस केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज 370 कलमासंदर्भतील दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर केलं आहे. तसंच, जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचे विधेयक सभागृहात ठेवण्यात आले आहे. मोदी सरकारने भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयासाठी बॉलिवूडमधील मंडळींनी सोशल मीडियाद्वारे त्यांचे स्वागत केले आहे.

 

काश्मीर प्रश्नावर आता खऱ्या अर्थाने तोडगा निघेल असे अनुपम खेरने ट्वीट करत लिहिले आहे.

लवकरच काहीतरी घडेल असे जायरा वसीमने ट्वीट करत म्हटले आहे

तर काश्मीरमधील लोकांनी आपली काळजी घ्यावी असे आव्हान संजय सुरीने लोकांना केले आहे.

माझ्या प्रार्थना काश्मीरसोबत असून शांततेसाठी मी प्रार्थना करत आहे असे ट्वीट दिया मिर्झाने केले आहे

तर कुणाल कोहलीने इतिहास निर्माण होत असल्याचे ट्वीटद्वारे म्हटले आहे.

 

काय आहे कलम 370?तत्कालीन राष्ट्रपतींच्या आदेशावरून 1954 मध्ये 35-ए कलमाचा संविधानात समावेश करण्यात आला. कलम 35-एची अंमलबजावणी करण्यासाठी तत्कालीन सरकारने कलम 370चा वापर केला होता. कलम 370 मुळे जम्मू-काश्मीरला आधीच विशेष राज्याचा दर्जा प्राप्त होता. पण कलम 35Aमुळे जम्मू-काश्मीरच्या राज्य सरकारला स्वतःचं संविधान आणि काही विशेष कायदे बनवण्याचे अधिकार देण्यात आले. यामुळे जम्मू-काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला राज्यातील संपत्ती खरेदी करता येत नाही. तसेच राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभसुद्धा मिळत नाही. राज्याबाहेरच्या व्यक्तींना सरकारी नोकरीत संधी दिली जात नाही.  या विशेष अधिकारामुळे राष्ट्रपतींना राज्याची घटना बरखास्त करण्याचादेखील अधिकार नाही.

 

तसेच कलम 370मधील तरतुदीअंतर्गत संसदेला जम्मू-काश्मीरसाठी फक्त संरक्षण, विदेश आणि दळणवळणाशी संबंधित प्रकरणांमध्येच कायदा बनवण्याचा अधिकार आहे. या कलमामुळे जम्मू-काश्मीरच्या लोकांना त्यांच्या सोयीनुसार त्यांचे हित आणि कायदे निश्चित करण्याचा अधिकार मिळतो. केंद्र सरकारच्या दबावातून मुक्त होऊन ते स्वत:साठी आपल्या गरजांनुसार कायदा तयार करू शकतात. या कायद्यांतर्गत इतर राज्यातील लोकांना जम्मू-काश्मीरात नोकरी मिळवण्याचा अधिकार नाही. राज्याच्या शासकीय सेवादेखील केवळ जम्मू-काश्मीरच्या उमेदवारांसाठीच आहेत. यामुळे राज्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी सुरक्षित राहतात.

 

टॅग्स :जम्मू-काश्मीरअनुपम खेरझायरा वसीमदीया मिर्झासंजय सुरीकलम 370