बॉलिवूडमध्ये सध्या नितेश तिवारी यांच्या 'रामायणा'ची चर्चा रंगली आहे. या बहुप्रतीक्षित बिग बजेट सिनेमात अभिनेता रणबीर कपूर 'रामायण'मध्ये प्रभू श्रीराम ही भूमिका साकारणार आहे. रामानंद सागर यांच्या 'रामायण' या मालिकेत रामाची भूमिका साकारून अरुण गोविल घराघरात पोहोचले. प्रभू श्री राम म्हटलं की आजही पहिल्यांदा अरुण गोविल यांचा चेहरा समोर येतो. आजही लोकांच्या मनात त्यांची छबी कायम आहे. आता 'रामायण' सिनेमात रणबीर कपूर राम साकारणार आहे. यावर अरुण गोविल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रणबीर कपूर श्री रामाची भूमिका योग्यरित्या साकारू शकेल की नाही? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देत अरुण गोविल म्हणाले, "हे येणारा काळच ठरवेल. आधीच याबाबत मी बोलू शकत नाही. पण, रणबीर एक उत्तम अभिनेता आहे. मी त्याला जितकं ओळखतो. मला वाटतं तो एक संस्कारी मुलगा आहे. त्याच्याकडे नैतिकता, संस्कार आणि संस्कृती आहे. मी त्याला अनेक वेळा पाहिलं आहे. मला विश्वास आहे की तो नक्कीच ही भूमिका चांगल्या प्रकारे साकारण्यासाठी प्रयत्न करेल."
दरम्यान, अरुण गोविल या सिनेमात राजा दशरथ ही भूमिका साकारणार आहेत. नितेश तिवारींच्या रामायणबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या सिनेमात रणबीर कपूर राम तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत आहे. सुपरस्टार यश रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल तर लारा दत्ता कैकयी ही भूमिका साकारताना दिसेल. रकुल प्रीत सिंह शूर्पणखेची भूमिका साकारणार आहे.