आपल्या हरहुन्नरी अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान पटकावणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे अरुणा इराणी (Aruna Irani ). नायिका, खलनायिका, चरित्र अभिनेत्री अशा विभिन्न भूमिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेचं सोनं केलं. बाँबे टू गोवा, उपकार, राजा बाबू, लाडला, लावारीस या सिनेमात त्या झळकल्या. मै लक्ष्मी तेरे आंगन की, झाँसी की रानी, देखा एक ख्वाब या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं. अरुणा इराणी यांचा आज ३ मे रोजी वाढदिवस.
अरुणा इराणी यांनी एका लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शकासोबत लग्नगाठ बांधली मात्र आयुष्यात कधीही आई न होण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत त्यांनी या मागचं कारण सांगितलं होतं. ८० आणि ९० च्या दशकात अरुणा इराणी यांनी बहुतेक चित्रपटांमध्ये आईच्या भूमिकेत साकारल्या. 'बेटा' चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. प्रोफेशनल लाईफसोबत अरुणा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिल्या. त्यांचं नाव कॉमेडियन आणि अभिनेते मेहमूद यांच्यासोबतही जोडलं गेलं. मात्र लग्न त्यांनी दिग्दर्शक कु कू कोहली यांच्याशी केलं.
एका मुलाखतीत त्या म्हणालेल्या होत्या की, '''कुकुजी (संदेश कोहली) यांना जेव्हा भेटले तेव्हा मी ४० वर्षांची होते. ते माझ्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. मी दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करण्याचा विचार करत होते पण त्यांनी तसं होऊ दिलं नाही. खरं सांगायचं तर मीही त्यांच्याशी भावनिकरीत्या जोडले गेले होते.' लग्नापूर्वी अरुणा यांना माहीत होतं की कुकुजी आधीपासूनच विवाहित आहेत आणि त्यांना २ मुली आहेत. त्यांनी १९६० मध्ये कुकू कोहली यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी आई न होण्याचा निर्णय घेतला.
फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी यामागचं कारण सांगितलं होतं. त्या म्हणालेल्या, 'एका विवाहित पुरुषाशी लग्न करण्याचे काही तोटेही असतात. त्यांचं आधीच एक कुटुंब होतं. जेव्हा मी माझ्या भाच्यांना पाहते मस्ती करताना तेव्हा मला वाटतं बरं झालं मला मुलं नाहीयेत. माझ्या एका मित्राने मला यासाठी मानसिकदृष्टया तयार केले होतं. तो म्हणाला होता, तुझ्या आणि तुझ्या मुलांच्या वयात जे अंतर असेल तो जनरेशन गॅप असेल. तुला मुलं सांभाळायला फार अडचणी येतील.' यामुळे अरुणा यांनी कधीही आई न बनण्याचा निर्णय घेतला.