बॉलिवूडमध्ये विशिष्ट गाण्यांनी प्रेक्षकांवर छाप पाडणाऱ्या पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosle) आज ९० वा वाढदिवस साजरा करत आहेत. आजही त्यांचा आवाज ऐकला तर त्यांच्या वयाचाही विसर पडतो. आपल्या गायकीने त्या आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्या गाजवत आहेत. आशाताईंबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला माहितीये का? आशा भोसलेंनी चक्क दादा कोंडकेंना (Dada Kondke) थेट लग्नाची मागणी घातली होती. मात्र त्यांनी ठेवलेल्या दोन अटी दादा कोंडकेंना मान्य नसल्याने दोघांचं लग्न होऊ शकलं नाही.
दादा कोंडकेंच्या 'एकटा जीव' या आत्मचरित्रात आशा भोसलेंबरोबरच्या प्रेमसंबंधाचा उल्लेख केला आहे. सत्तरच्या दशकातली ही गोष्ट आहे. आशा भोसले आणि दादा कोंडकेंचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. आशाताई आणि दादा कोंडके दोघंही घटस्फोटित होते.'विच्छा माझी पुरी करा' या नाटकामुळे दोघंही जवळ आले. आशाताईंनी दादा कोंडकेंची आणि नाटकातील कलाकारांची भरभरुन स्तुती करायच्या. त्यांनी हे नाटक अनेकदा पाहिलं. दरम्यान दोघांची जवळीक वाढली. दोघंही सोबत फिरायचे, रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचे. याची लता मंगेशकर यांनाही कल्पना होती.
लग्नासाठी दोन अटी ठेवल्या
एक दिवस आशा भोसलेंनी दादा कोंडकेंसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र यावेळी त्यांनी दोन अटी ठेवल्या. एक म्हणजे लग्नानंतर कोंडके हे आडनाव लावणार नाही आणि दुसरं म्हणजे दोघांनी आशा भोसलेंच्या घरी राहायचं. या दोन अटी ऐकून दादा कोंडके पुरते गोंधळले. हा गोंधळ दूर करण्यासाठी ते थेट कोल्हापूरला भालजी पेंढारकर यांच्या भेटीला गेले. दादा पेंढारकरांना गुरु मानायचे. भालजी पेंढारकर यांनी दादा कोंडकेंना अजिबात लग्न करु नको असा सल्ला दिला. दादांनी तो सल्ला मानला आणि आशाताईंना नम्रपणे नकार दिला.
पुढे कालांतराने आशा भोसले आर डी बर्मन यांच्या प्रेमात पडल्या. दादांनी त्यांना आरडींशी लग्न करु नको असं सांगितलं. मात्र आशाताईंनी ऐकलं नाही आणि त्या आर डी बर्मन यांच्यासोबत लग्नबंधनात अडकल्या.