आशा भोसले यांचा आज म्हणजेच आठ सप्टेंबरला वाढदिवस आहे. १९४३ पासून ते आजवर आशा यांनी अनेक दर्जेदार गाणी गायली आहेत. त्यांनी चुनरिया या सिनेमाद्वारे बॉलिवूडमधील त्यांच्या गायनाला सुरुवात केली. बॉलिवूडमधील महान गायकांमध्ये आज त्यांची गणना होते. त्यांनी १६ हजाराहून अधिक गाणी गायली आहेत. मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपूरी, तमीळ, मल्याळम, इंग्रजी अशा विविध भाषांमधील त्यांची गाणी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहेत. आशा भोसले यांनी आजवर अनेक अडचणींवर मात करत यश मिळवले आहे. आशा भोसले यांचे वडील दिनानाथ मंगेशकर एक महान गायक होते. लता मंगेशकर यांना त्यांनी लहानपणापासूनच गायनाचे धडे दिले. वडील आणि बहीण घरी रियाज करत असताना आशा त्यांना नेहमी पाहात असत.
आशा भोसले या लहान असताना आपण देखील इतर मुलांप्रमाणे शाळेत शिकावे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्या एकदा लता यांच्यासोबत शाळेत गेल्या. पण एका मुलाच्या फी मध्ये दोन मुलांना शिकवले जाणार नाही असे शिक्षकांनी त्यांना सुनावले. हे ऐकून आशा आणि लता यांना त्यांचे अश्रू आवरले नाहीत. दिनानाथ मंगेशकर यांना ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी दोघींना शाळेत न पाठवता दोघींचे शिक्षण घरातच सुरू केले. आशा यांनी खूपच लहान वयात गायनाला सुरुवात केली. त्यावेळी लता मंगेशकर, गीता बाली, शमशाद बेमग यांसारख्या गायिका बॉलिवूडवर राज्य करत होत्या. त्यामुळे या तिघींनी नाकारलेली गाणीच आशा भोसले यांच्या वाट्याला येत असत. तसेच सहअभिनेत्री, खलनायिका यांच्यावर चित्रीत केल्या जाणाऱ्या गाण्यांसाठीच आशा भोसले यांचा विचार केला जात असे. पण ही परिस्थिती काहीच वर्षांत बदलली.
आशा भोसले यांनी वयाच्या केवळ १६ व्या वर्षी गणपतराव भोसले यांच्यासोबत लग्न केले. त्यावेळी गणपतराव हे ३१ वर्षांचे होते आणि लता यांचे ते सेक्रेटरी होते. या लग्नाला मंगेशकर कुटुंबियांचा विरोध होता. पण आशा यांनी सगळ्यांचा विरोध पत्करून गणपतराव यांच्यासोबत लग्न केले. आशा भोसले यांच्या या निर्णयामुळे लता आणि त्यांच्यात अनेक वर्षं अबोला होता. लग्नाच्या काहीच वर्षांत आशा आणि त्यांच्या पतीत खटके उडायला लागले. त्यांचे पती हे अतिशय संशयी होते. तसेच त्यांना सासरची मंडळी देखील वाईट वागवत होती. आशा भोसले तिसऱ्या मुलाच्या वेळी गरोदर होत्या, त्यावेळी त्यांना घरातून बाहेर काढण्यात आले. पण आशा भोसले यांनी कोणत्याही परिस्थितीत हार न मानता त्यांच्या मेहनतीने यश मिळवले. आशा भोसले यांनी काही वर्षांनी राहुल देव बर्मन म्हणजेच आर डी बर्मन यांच्यासोबत दसुरे लग्न केले. आरडी हे त्यांच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान होते.
आशा भोसले यांना आजवर १८ वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे तर सात वेळा त्यांनी या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. पण १९७९ मध्ये त्यांनी फिल्मफेअर जिंकल्यावर स्वतःचं नामांकन नाकारलं. नव्या गायकांना संधी मिळाली पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. त्यांना आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना उत्साद अली अकबर खान यांच्यासोबतच्या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन देखील मिळाले आहे.