Asha Bhosle: काल संपूर्ण महाराष्ट्रात २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Gaurav Din 2025) साजरा झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Mns Chief Raj Thackeray) यांच्या पुढाकाराने मनसेचा 'मराठी भाषा गौरव दिन' पार पडला. यानिमित्त मुंबईच्या दादर परिसरातील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात भव्य पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. पुस्तक प्रदर्शनासोबतच कवितांची मैफीलही रंगली. या कार्यक्रमासाठी जावेद अख्तर, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, सोनाली बेंद्रे, आशा भोसले, नागराज मंजुळे यांच्यासह सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी भारतीय गायनविश्वातील प्रख्यात गायिका म्हणजे आशा भोसले यांनीही कविता वाचन केलं. तसेच आजारी होते, पण दोस्त राज ठाकरेंसाठी कार्यक्रमात आले, असंही त्यांनी म्हटलं.
आशा भोसले यांनी मराठी भाषा आणि साहित्याचे महत्त्व सांगत 'केव्हा तरी पहाटे' हे गीत गायले. तसेच त्याचा अर्थही सांगितला. त्या म्हणाल्या, "या कार्यक्रमात राज ठाकरेंनी मला बोलावलं, ते त्यांच्या प्रेमामुळं की गेल्या जन्माच्या कुठल्या वैरामुळं. माझा कवितेशी संबंध वयाच्या दहाव्या वर्षांपासून आलाय आणि साहित्य मी शिकलेली नाही. खरं म्हणजे शिक्षणामुळं खूपच विद्या मिळते, आपण सुसंस्कृत होते, असं आपण म्हणतो. पण, जी पुस्तके बाहेर ठेवलेली आहेत, ती पुस्तके जर तुम्ही वाचली तर तुम्ही खरंच सुसंस्कृत व्हाल. गेल्या दहावर्षांपासून मी पुस्तक वाचतेय. माझा वाचनाचा नाद खूप होता. त्यामुळे मी तुमच्याशी मराठीत बोलू शकतेय. कारण, कोल्हापूरात राहिलेलं. कोल्हापुरी भाषेचं पाणी चढलेलं होतं. पण, ते काढून टाकलं ते पुस्तकामुळं. आता आपली भाषा दोन कोसावर बदलते. घाटावर गेलं की हळूहळू भाषा बदलत जाते. ती भाषा फार गोड असते. फक्त पुण्यात स्वच्छ भाषा ऐकायला मिळते. पुण्यात ७५ टक्के आणि मुंबईत २५ टक्के शुद्ध भाषा राहिली आहे. मुंबईचं नाव मुद्दामून घेतलं, नाहीतर उद्या घराबाहेर २०० लोक येऊन आम्ही शुद्ध बोलत नाहीत का? असं विचारतील".
मराठी भाषा कशी टिकवावी, याबद्दल उपाय सुचवत त्यांनी म्हटलं, "वाचनामुळे भाषा शुद्ध होते. मराठी भाषा टिकवायची असेल तर आईने मराठीत बोललं पाहिजे. आई मुलाला संस्कार देते, भाषा शिकवते. जर आईच मराठी नसेल किंवा समजत नसेल तर मुलगा मराठी कसा शिकणार? आजच्या जगात इंग्लिश हे फार महत्त्वाचं आहे. पण, आपली मातृभाषा टिकवूनही इंग्रजी शिकलं पाहिजे. आईने बोलली तर मातृभाषा येईलच. आजकाल मराठी लोक घरामध्येच इंग्रजीच बोलतात. हे गुड मॉर्निंग! असं ते घरात म्हणतात. पण, आई आणि मुलीने एकमेकीला सुप्रभात म्हणावं. मराठी शाळांमधून एक तास चांगलं मराठी पुस्तक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्रसारखं एक पान रोज वाचलं पाहिजे. हे पुस्तक आईकडेही पोहोचवल पाहिजे. ते पुस्तक आईनेही वाचलं पाहिजे. इंग्रजांनी लिहिलेला नाही तर आपला खरा इतिहास त्यांना कळला पाहिजे".
त्या म्हणाल्या, "मराठी भाषा इतकी गोड, लवचिक आहे. मधाचा थेंब कानात पडल्यानंतर ओघळत ह्रदयापर्यंत जाऊन पोहोचतो अशी ही भाषा आहे. या भाषेला दुधारी तलवारही आहे. अवधान जर नाही ठेवलं, तर काहीही अर्थ निघून जातो. आणि, व, ऱ्हस्व, दीर्घ सगळं काही पाहावं लागतं".
राज ठाकरे यांच्याबद्दल बोलताना (Asha Bhosle On Mns Chief Raj Thackeray) त्या म्हणाल्या, " याठिकाणी सर्व दिग्गज मंडळी बसली आहेत. पण, मला का बोलावलं हेच मला कळालं नाही. चार-पाच दिवसांपूर्वी मला राज ठाकरेंचा फोन आला. ते फार उत्साहात होते. ते मला त्यांच्या 'ठाकरे' आवाजात म्हणाले, आशाताई मला तुम्ही २७ तारखेला काही झालं तरी संध्याकाळी ६ वाजता हव्यात. यावर मी त्यांना म्हटलं, '६० वर्षं उशीर झाला बरं का'. तर त्यांनी म्हटलं, काव्यवाचन करायचं आहे आणि जरुर यायला पाहिजे आहे असं सांगितलं. मी आजारी होते, पण राज ठाकरेंना नाही कसं म्हणायचं. म्हणजे माझ्या बंगल्यात ज्या माणसाने एवढी मोठी महादेवाची पिंड आणून बसवली. त्याला मी नाही कसं म्हणू. तो दोस्त आहे आणि दोस्ताला कोणी नाही म्हणत का. त्यामुळे आज मी याठिकाणी आले. तब्येत बरी नाही, तरीही आले आहे.मला असं वाटतंय की त्यांनी मला चुकून याठिकाणी बोलावलं असावं घाईघाईमध्ये, त्यांनी असं म्हणताच सर्वांनाच हसू अनावर झालं.