भारताच्या नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरलं आणि भारतीयांचा ऊर अभिमानानं भरून आला. नीरजवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत नीरजला शुभेच्छा दिल्यात. पण यादरम्यान चित्रपट निर्माते अशोक पंडित (Ashoke Pandit) यांनी अशा काही शुभेच्छा दिल्यात की, त्यांच्या शुभेच्छांचं ट्विट पाहून नेटक-यांचा संताप अनावर झाला. मग काय, अनेकांनी अशोक पंडित यांची चांगलीच शाळा घेतली. अशोक पंडित यांनी नीरजला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. पण या शुभेच्छांना त्यांनी राजकीय रंग दिला.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ हे नाव बदलून त्याला ‘मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार’ असं नवं नाव दिलं. याच पार्श्वभूमीवर अशोक पंडित यांनी नीरजला शुभेच्छा दिल्या. ‘राजीव गांधी यांचं नाव बदलताच भारताला सुवर्णपदक मिळालं,’असं ट्विट त्यांनी केलं. त्यांचं हे ट्विट पाहून अनेकांनी त्यांना फैलावर घेतलं. अनेकांनी खेळाचा संबंध राजकारणाशी जोडल्याबद्दल अशोक पंडित यांना ट्रोल केलं. ‘भारतानं सुवर्ण पदक पटकावल्याचा आनंद नाही का? किमान खेळात तरी राजकारण आणू नका,’ असं एका युजरने त्यांना सुनावलं.
एका युजरने तर चक्क, ‘तुमचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. तुम्हाला उपचाराची गरज आहे. काँग्रेसनं बनवलेल्या एखाद्या रूग्णालयात जाऊन उपचार घ्या,’ अशी संतप्त भावना व्यक्त केली.
‘सरकार बदलू द्या, तुम्हीही बदलाल,’ अशी प्रतिक्रिया अन्य एका युजरने दिली. ‘राजीव गांधी यांचं नाव असतानाच अभिनव बिंद्राने सुवर्णपदक जिंकलं होतं,’ असं एका युजरनं त्यांना सुनावलं.
नीरजने पहिली फेक 87.3 मीटर, दुसरी फेक 87.58 मीटर, तिसरी फेक 76.79 मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. चौथी आणि पाचवी फेक फाउल गेली. मात्र पहिल्या तीन फेकीत त्याची कामगिरी उत्तम ठरली. नीरजने सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला . या सुवर्ण कामगिरीनंतर नीरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.