आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पाणिपत’मध्ये क्रिती सॅनन साकारणार ‘ही’ भूमिका!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 9:33 AM
आशुतोष गोवारीकर पुन्हा एकदा एक पीरियड ड्रामा घेऊन येत आहेत, ही बातमी आम्ही कालच तुम्हाला दिली. ‘पाणिपत’ असे नाव ...
आशुतोष गोवारीकर पुन्हा एकदा एक पीरियड ड्रामा घेऊन येत आहेत, ही बातमी आम्ही कालच तुम्हाला दिली. ‘पाणिपत’ असे नाव असलेल्या या चित्रपटाचा फर्स्ट लूकही तुम्ही पाहिलातं. शिवाय या चित्रपटाच्या अर्जुन कपूर, संजय दत्त आणि क्रिती सॅनन या स्टारकास्टबद्दलही आम्ही तुम्हाला सांगितले. आता या पुढची एक बातमी आहे. होय, ‘पाणिपत’मध्ये अर्जुन, संजय आणि क्रिती मुख्य भूमिकेत असतील, हे आम्ही तुम्हाला सांगितले असले तरी त्यांची नेमकी भूमिका काय असेल, हे आम्ही स्पष्ट केले नव्हते. तर आता त्याचाही खुलासा झाला आहे. होय, अर्जुन कपूर मराठा योद्धा सदाशिवराव भाऊ पेशवे याची भूमिका साकारणार आहे. संजय दत्त अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत दिसणार आहे तर क्रिती सदाशिवराव यांची दुसरी पत्नी पार्वतीबाईची भूमिका जिवंत करणार आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर व संजय दत्त तलवारबाजी करताना दिसणार आहेत. क्रितीही यासाठी तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतेयं.पार्वतीबाई पानिपत संग्रामाच्यावेळी पतीसमवेत प्रत्यक्ष रणभूमीवर गेल्या होत्या. पार्वतीबाईंच्या दुदैर्वाने त्याना पतीच्या शवाचे दर्शन झाले नाही. कारण युद्धातील कधीही भरून न येणा-या हानीनंतर काही विश्वासू सरदार-सैनिकांनी त्यांना पानिपतहून पुण्यात सुखरूप आणले. पण ‘पतीला मृत पाहिले नाही’ या कारणावरून पार्वतीबाईनी स्वत:ला ‘विधवा’ मानले नाही . ‘तोतयाच्या बंडा’ला त्या निक्षून सामोरे गेल्या होत्या आणि तो प्रकार माधवरावांच्या मदतीने त्यानी धीटपणे मोडून काढला होता. ALSO READ : आशुतोष गोवारीकर पुन्हा घेऊन येणार ऐतिहासिक चित्रपट; ‘पानिपत’चे फर्स्ट लूक जारी! ‘पानिपत’ हा आशुतोष गोवारीकर यांचा आगामी चित्रपट पानिपतच्या तिस-या युद्धावर आधारित आहे. १७६१ रोजी मराठे सदाशिवराव पेशवे आणि अफगाण घुसखोर अहमद शाह अब्दाली यांच्यात तिसरे युद्ध झाले. या युद्धात सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले,पण अब्दालीचीही मोठी हानी झाली.