दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा २०१६ मध्ये प्रदर्शित ‘मोहंजोदारो’ या चित्रपटाने सगळ्यांचीच निराशा केली होती. पण हे अपयश विसरून गोवारीकर पुन्हा एकदा सज्ज झालेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचे नाव ‘पानीपत’. पानिपतच्या तिस-या युद्धावर आधारित हा चित्रपट यावर्षाअखेरिस प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पण तत्पूर्वी आशुतोष गोवारीकर यांनी आणखी एका चित्रपटाची तयारी सुरु केली आहे. होय, श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडची यशोगाथा आशुतोष पडद्यावर दाखवणार आहेत. आशुतोष यांच्या प्रॉडक्शन हाऊसचा हा सिनेमा अंकुश व ग्लेन दिग्दर्शित करणार असल्याचीही खबर आहे.
अंकुश व ग्लेन यांनी आशुतोष यांच्यासोबत सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरु झाले आहे. ‘कर्रम् कुर्रम्’ हा मंत्र जपत लिज्जत पापडने अनेक वर्षांचा प्रवास यशस्वीपणे पार केला आहे. ७ महिलांनी सुरू केलेला पापड उद्योग ४५,००० महिलांच्या रोजगाराचे साधन बनला आहे. सन १९५९ मध्ये उजामबेन कुंडालिया , लागुबेन गोकानी, जयाबेन विठलानी, पार्वतीबेन थोडानी, बानुबेन तन्ना आणि जसवंतीबेन पोपट या गिरगावात लोहाणा निवास येथे राहणा-या मध्यमवर्गीय गुजराती महिलांनी पापड उद्योगाला सुरुवात केली. दुपारच्या फावल्या वेळेत पोटापाण्यासाठी काहीतरी उद्योग सुरू करावा, असे त्यांनी ठरवले. केवळ ८० रूपयांच्या भांडवलाने सुरुवात झालेला हा उद्योग आज हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे. या उद्योगाने हजारो महिलांच्या हातांना काम दिले. असंख्य महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. लाखो महिला आज स्वयंपूर्ण आहेत. पैकी सुमारे ४५ हजार महिला सदस्य आहेत. प्रत्येक सदस्य महिला, सहमालक असल्याने कंपनीचा नफा प्रत्येकीला समान आणि वाढीव वणाईच्या स्वरूपात दिला जातो. आज कंपनीची उलाढाल १२७१ कोटी रुपये असून ४४ कोटी रुपयांची परदेशी निर्यात आहे.