अश्विनी काळसेकरच्या टिंडे शॉर्ट फिल्मला मिळाले फिल्मफेअरमध्ये नामांकन, पाहा ही शॉर्टफिल्म
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 06:58 PM2020-01-27T18:58:09+5:302020-01-27T19:00:29+5:30
टिंडे या शॉर्टफिल्ममध्ये अदा शर्मा, अश्विनी काळसेकर आणि राजेश शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत.
फिल्मफेअर पुरस्कारांच्या नामांकनाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. यात शॉर्ट फिल्म कॅटेगरीत टिंडे या शॉर्ट फिल्मला नामांकन मिळाले असून या शॉर्ट फिल्मची सध्या चांगलीच चर्चा आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये एक मजेशीर गोष्ट मांडण्यात आली असून अदा शर्मा, अश्विनी काळसेकर आणि राजेश शर्मा यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. या शॉर्टफिल्मचे निर्माते पराग देसाई आणि सेजल कौशिक असून याचे दिग्दर्शन सीमा देसाई यांनी केले आहे.
टिंडे या शॉर्ट फिल्ममध्ये आपल्याला बाबू क्रांती नावाच्या वयाची चाळीशी पार केलेल्या माणसाची कथा पाहायला मिळते. हा माणूस आपल्या पत्नीच्या सततच्या कटकटीमुळे कंटाळलेला असतो. त्याला त्याच्या ऑफिसमधील एक व्यक्ती टिंडे या अॅपविषयी सांगतो. या अॅपद्वारे त्याची मौलीसोबत ओळख होते. ती अतिशय चंचल आणि मस्तमौल असते. त्याला ही मौली प्रचंड आवडते. ही मौली खरंच जशी दिसते तशी आहे की तिचा बाबूशी बोलण्याचा काही तरी वेगळाच उद्देश आहे हे प्रेक्षकांना या शॉर्ट फिल्ममध्ये पाहायला मिळते. ही शॉर्ट फिल्म प्रेक्षकांना खळखळून हसवते यात काहीच शंका नाही.
टिंडेमधील अदा शर्मा, राजेश शर्मा, अश्विनी कळसेकर यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. तसेच सीमा देसाई यांच्या दिग्दर्शनाचे देखील कौतुक झाले आहे. 20 मिनिटांची ही शार्ट फिल्म असून या शॉर्ट फिल्मला समीक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. फिल्मफेअरच्या https://www.filmfare.com/awards/short-films-2020/finalists/tindey/3542 या वेबसाईटला जाऊन तुम्ही ही शॉर्ट फिल्म पाहू शकता आणि या शॉर्ट फिल्मसाठी व्होट देखील करू शकता.