असिनने तिच्या चाहत्यांना ओनम या सणाच्या शुभेच्छा एका वेगळ्या अंदाजात दिल्या आहेत. असीनने या सणाच्या निमित्ताने तिच्या मुलीचा गेल्या वर्षीचा ओनम सण साजरा करतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. असिनने शेअर केलेल्या या फोटोत तिची मुलगी अरिनने पांढऱ्या आणि सोनेरी रंगाचा परकर पोलका घातलेला आहे. या फोटोत अरिनच्या चेहऱ्यावर अतिशय गोड हास्य आपल्याला पाहायला मिळत आहे. या फोटोसोबत असिनने लिहिले आहे की, हा फोटो गेल्या वर्षी ओनम या सणाला आम्ही काढला होता. त्यावेळी माझी मुलगी अरिन ही केवळ दहा महिन्यांची होती.
असिनने आणखी एक फोटो इन्स्टाग्रामला शेअर केला असून या फोटोत आपल्याला तिच्यासोबत तिचे पती राहुल शर्मा दिसत आहे. हा फोटो देखील गेल्या वर्षी ओनमला काढण्यात आलेला आहे. या फोटोसोबत तिने लिहिले आहे की, पालक म्हणून आमच्या दोघांचा हा पहिला ओनम होता.
असिनने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. क्वीन ऑफ कॉलिवूडच्या नावाने असिनला ओळखले जाते. आमिर खानसोबत असिनने गजिनीमध्ये काम केले होते. या चित्रपटानंतर तिला सलमान खान आणि अक्षय कुमारसोबत काम करण्याची संधी मिळाली. असिनने अक्षयसोबत हाऊसफुल २, खिलाडी ७८६ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षय आणि असिनची खूप चांगली मैत्री जमली होती. असिन 2015 मध्ये आलेल्या ऑल इज वेल या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत शेवटची दिसली होती. त्यानंतर मात्र तिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला आणि राहुल शर्मासोबत संसार थाटला. असिन आपल्या करिअरची सुरुवात दक्षिणात्य चित्रपटातून केली.
19 जानेवारी 2016ला दिल्लीमध्ये मायक्रोमॅक्स कंपनीचा को-फाऊंडर असलेल्या राहुल शर्मासोबत विवाहबंधनात अडकत असिनने सगळ्यांना आश्चर्याया धक्का दिला होता. असिनने आधी राहुलसोबत चर्च मध्ये आणि नंतर हिंदु पद्धतीनुसार लग्न केले होते. राहुल आणि असिनची ओळख अक्षय कुमारने करून दिली होती.