हृषिता भटचा आज वाढदिवस असून तिने असोका, दिल विल प्यार प्यार, हासिल, अब तक छप्पन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या काही वर्षांत ती खूपच कमी काम करत असली तरी ती काही महिन्यांपूर्वी हप्पी, चार्जशीट या वेबसिरिजमध्ये दिसली होती. पण त्यांची म्हणावी तशी चर्चा झाली नाही. हृषिता अभिनयक्षेत्रात खूपच कमी काम करत असली तरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो, व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.
हृषिता आजही तितकीच फिट दिसत असून तिच्या लूकची नेहमीच चर्चा सोशल मीडियावर रंगलेली असते. हृषिताचे लग्न काही वर्षांपूर्वी झालेले असून तिने तीन वर्षांपूर्वी अगदी गुपचूप युएन डिप्लोमेट आनंद तिवारी याच्यासोबत लग्नगाठ बांधली होची. अतिशय जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला होता. हृषिताने या सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिच्या चाहत्यांना याविषयी सांगितले होते. लग्न करण्याच्या सहा महिने आधीपासून हृषिता आणि आनंद रिलेशनशिपमध्ये होते. सहा महिन्यांच्या डेटिंगनंतर त्यांनी ४ मार्च २०१७ ला लग्न केले होते.
२००१ मध्ये आलेल्या ‘अशोका’ या चित्रपटाद्वारे हृषिताने बॉलिवूड डेब्यू केला होता. २००३ मध्ये आलेल्या ‘हासिल’मधील हृषिताच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले. यानंतर ती अनेक चित्रपटांत दिसली. हिंदीसोबतच बंगाली, तेलगू व मराठी चित्रपटांमध्येही हृषिताने काम केले. २०१५ मध्ये हृषिताच्या लग्नाची अफवा उडाली होती. मात्र असे काहीही नसल्याचे तिने स्पष्ट केले होते. खरे तर हृषिताला आर्किटेक्ट बनायचे होते. मात्र सात वर्षांची असताना आईने हृषिताना कथ्थकच्या क्लासमध्ये टाकले. यानंतर ती १२ वीत असताना एका शोमधील मुलगी अचानक आजारी पडली आणि शिक्षिकेने या मुलीच्या जागेवर हृषिताला पाठवले. विशेष म्हणजे हृषिताने हा शो जिंकला. यानंतर मॉडेलिंग, जाहिराती तिला मिळाल्या.