मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झालं. एका दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून वायपेयी चांगलेच परिचीत होते. बॉलिवूड कलाकारांमध्येही त्यांचे कितीतरी चाहते होते. आता त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. त्यांचा असाच एक किस्सा चर्चेचा विषय ठरतोय. तो म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांनी अमिताभ बच्चन यांना रेखाचं नाव घेऊन काढलेला चिमटा.
१९८४ मध्ये महानायक अमिताभ बच्चन यांनी लोकसभा निवडणुकीत इलाहाबादमधून हेमवती नंदन बहुगुणा यांना हरवले होते. ते पहिल्यांदा खासदार झाले होते. पण नंतर बोफोर्स घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांनी १९८७ मध्ये राजीनामा दिला होता.
एका मुलाखतीमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी अमिताभ बच्चन यांना चिमटा काढला होता. ते म्हणाले होते की, 'त्यांनी राजकारणात यायला नको होतं. पण राजकारण्यांना हरवण्यासाठी अभिनेत्यांना आणलं गेलं. जर मी दिल्लीतून निवडणूक लढवली असती तर ते कदाचित माझ्या विरोधात उभे राहिले असते.
ते म्हणाले की, एकदा मला मीडियाने विचारले होते की, जर तुमच्या विरोधात अमिताभ बच्चन उभे राहिले तर तुम्ही काय कराल. यावर मी म्हणालो होतो की, मला रेखाला प्रार्थना करावी लागेल की, तिने आमच्याकडून निवडणूक लढवावी. मी अभिनेत्यांचा तर सामना करु शकत नाही. अभिनेत्रीसोबत मैत्री करणे चांगले आहे. पण त्या मैत्रीने राडकारण खराब करणे चांगले नाही'.