मोतीचूर चक्कनाचूर या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाद्वारे नवाझुद्दीन सिद्दीकी आणि अथिया शेट्टी ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या दोघांच्या जोडीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर आणखी एक गोष्ट प्रेक्षकांना आकर्षित करत आहे, ती म्हणजे या चित्रपटात बोलली गेलेली बुंदलखंडची भाषा... नवाझ आणि अथिया दोघेही खूपच चांगल्याप्रकारे ही भाषा या ट्रेलरमध्ये बोलताना दिसत आहेत. या चित्रपटाची कथा भोपालमधील असून ॲनी आणि पुष्पेंद्र या दोघांची कथा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ॲनीची भूमिका या चित्रपटात अथियाने साकारली असून तिला परदेशात राहाणाऱ्या मुलासोबतच लग्न करायचे आहे तर पुष्पेंद्र 36 वर्षांचा झाला असला तरी त्याचे अद्याप लग्न झालेले नाहीये. त्यामुळे तो लग्न करण्यासाठी तो उतावीळ आहे. या चित्रपटातील कुटुंब हे भोपाळमधील राहात असल्याचे दाखवल्याने या चित्रपटातील काही संवाद हे मध्यप्रदेशमध्ये बोलल्या जाणाऱ्या बुंदलखंडी भाषेतील आहे.
नवाझ आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये विविध भाषा बोलताना दिसला आहे. पण ही अथियासाठी ही पहिलीच वेळ होती. पण तरीही एका वेगळ्या भाषेत ती अस्खलितपणे संवाद बोलताना दिसत आहे. अथिया पहिल्यांदाच कोणत्या तरी चित्रपटात एका छोट्याशा गावातील मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटासाठी तिने खास बुंदेलखंडी भाषा शिकली आहे. तिच्या या अनुभवाविषयी ती सांगते, मी ही भाषा काही चित्रपटांमध्ये ऐकली आहे. पण तरीही ही भाषा बोलणे आणि त्याचा उच्चार अगदी योग्य करणे हे माझ्यासाठी सोपे नव्हते. त्यामुळे मी या चित्रपटाचे लेखक मेघव्रत सिंग गुजर यांच्यासोबत काही वर्कशॉप केले. हे वर्कशॉप चित्रीकरणाच्या काही आठवडे आधी घेण्यात आले. हे माझ्यासाठी आव्हानात्मक असले तरी ही भूमिका चांगल्याप्रकारे साकारण्यासाठी याची गरज होती.
या चित्रपटाची निर्मिती वायकॉम 18 स्टुडिओ, वुडपेकर मुव्हीज, राजेश आणि किरण भाटिया यांनी केली असून या चित्रपटात नवनी परिहार, अभिषेक रावत यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन देबामित्रा बिस्वाल यांनी केले असून हा चित्रपट 15 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.