लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अभिनेता सनी देओल याच्या जुहू येथील सनी व्हिला या अलिशान बंगल्याच्या लिलावाची जाहिरात बँक ऑफ बडोदाने दुसऱ्याच दिवशी रद्द केली आहे. काही तांत्रिक कारणास्तव ही जाहिरात रद्द केली असल्याचे बँकेने कळवले आहे. आता तांत्रिक कारण नेमके काय आहे, असा प्रश्न राजकीय नेत्यांसह सोशल मीडियावरून देखील विचारला जात आहे.
गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या गदर-२ या सनी देओल याच्या सिनेमाने ३३० कोटी रुपयांचा गल्ला जमवल्यानंतर ५६ कोटी रुपयांच्या थकीत कर्जासाठी आलेल्या नोटिशीमुळे बॉलीवूडपासून त्याच्या चाहत्यांपर्यंत सर्वत्र खळबळ उडाली होती. तसेच, या निमित्ताने सनी देओल याचे कर्ज खाते थकीत झाल्याचीही माहितीही पुढे आली. मात्र, लिलावाची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत बँकेने यू-टर्न घेण्याइतपत पडद्यामागे काय घडामोडी घडल्या यावर तर्कवितर्क लढवले जात आहे.
सनी देओल याने २०१६ मध्ये एका सिनेमाच्या निर्मितीसाठी बँक ऑफ बडोदाकडून कर्जाची उचल केली होती. या कर्जासाठी सनीचा भाऊ व अभिनेता बॉबी देओल आणि सनीचे वडील विख्यात अभिनेते धर्मेंद्र हे दोघेही हमीदार होते. तसेच, सनी देओल याने जुहू येथील गांधीग्राम रोडवर असलेला सनी व्हिला हा अलिशान बंगला तारण म्हणून ठेवला होता. त्याचे हे कर्ज खाते डिसेंबर २०२२ मध्ये थकीत कर्ज खाते म्हणून घोषित झाले. त्यानंतर बँकेने सातत्याने या कर्जाच्या वसुलीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, कर्जाची वसुली न झाल्यामुळे अखेर बँकेने या कर्जासाठी तारण ठेवलेल्या त्याच्या अलिशान बंगल्याच्या लिलावाची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीद्वारे लिलावाची संपूर्ण प्रक्रिया देखील जाहीर करण्यात आली होती. २५ सप्टेंबर रोजी ई-ऑक्शन अर्थात ऑनलाईन पद्धतीने हा लिलाव होणार होता. इच्छुकांना बंगल्याची पाहणी करण्याची मुभाही देण्यात आली होती. मात्र, आता बँकेने तांत्रिक कारणास्तव ही जाहिरात रद्द करत लिलाव प्रक्रिया रद्द केली आहे.
बँक ऑफ बडोदा म्हणते...
लिलावाची जी नोटीस जारी करण्यात आली होती ती मालमत्तेच्या प्रातिनिधिक जप्तीची होती. मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी बँकेने १ ऑगस्ट रोजी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केलेला आहे. त्या अर्जाच्या अनुमतीची प्रतीक्षा आहे. मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा मिळाल्यानंतर लिलावाची प्रक्रिया पार पाडली जाईल. दरम्यान, लिलावाची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कर्जदाराने कर्जाच्या सेटलमेंटसाठी बँकेशी संवाद सुरू केला आहे. त्यामुळे ही नोटीस रद्द करण्यात आली आहे.
सनीचे कर्ज आणि जयराम रमेश यांचा सवाल
२४ तासांत असे कोणते तांत्रिक कारण घडले की, बँकेने ही जाहिरात रद्द केली असा सवाल कॉँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ट्विटरद्वारे विचारला आहे.