व्हॅलेंटाईन वीक सुरु झालाय. अनेकजण आपल्या साथीदारांसोबत हा प्रेमाचा महिना साजरा करण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच प्रेमी युगुलांसाठी आणि सर्व रसिक प्रेक्षकांसाठी जुने गाजलेले प्रेमपट पुन्हा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. काही निवडक चित्रपटगृहांमध्ये लोकप्रिय रोमँटिक सिनेमे पुन्हा एकदा रिलीज करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वांसाठी ही पर्वणी म्हणता येईल.
चित्रपटगृहांमध्ये व्हॅलेंटाईन फिल्म फेस्टिव्हल साजरा करण्यात येत आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'टायटॅनिक', 'जब वी मेट', 'प्यार का पंचनामा', 'मोहब्बते', 'ये जवानी है दीवानी', 'वीर-झारा', 'सीता रामम', 'प्रेमम', 'विन्नैथांडी वरुवाया', 'सप्त सागरदाचे एलो - साइड ए एंड साइड' आणि 'दिल दिया गल्ला' इत्यादी २६ सिनेमे पुन्हा रिलीज करण्यात येणार आहेत.
आजपासून म्हणजेच ९ ते १५ फेब्रुवारीपर्यंत हा फिल्म फेस्टिव्हल चालणार आहे. हिंदीशिवाय पंजाबी, तामिळ, तेलुगू आणि कन्नडसहित इतर भाषांतले सिनेमे प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळणार आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, गोवा, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, हैदराबाद, कोची, लखनऊ, जयपुर, इंदौर अशा शहरांमध्ये हा फिल्म फेस्टिव्हल साजरा होणाार आहे. PVR, INOX, CINEPOLIS अशा चित्रपटगृहांमध्ये हे सिनेमे पाहता येणार आहेत. ११२ रुपयांपासून या सिनेमांची तिकीटं उपलब्ध आहेत.