भोजपुरी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अक्षरा सिंह (akshara singh) हिच्याविषयी मोठी माहिती समोर आली आहे. बिहारमधील औरंगाबाद येथे एका कार्यक्रमासाठी गेलेल्या अक्षरावर लोकांनी दगडफेक करत हल्ला केला आहे. या हल्ल्यातून अक्षरा थोडक्यात बचावली आहे. मात्र, तिला प्रोटेक्ट करणारा एक पोलिस कर्मचारी मात्र जखमी झाला आहे.
१७ जानेवारी रोजी अक्षरा औरंगाबादमधील दाऊदनगर येथे एका शोरुमच्या उद्धाटनासाठी गेली होती. परंतु, अक्षरा या कार्यक्रमाला उशिरा पोहोचल्यामुळे तिचे चाहते चांगलेच नाराज झाले. इतकंच नाही तर तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी लोटली. या गर्दीमध्येच एकमेकांना धक्काबुक्की झाल्यामुळे संतप्त चाहत्यांनी दगडफेक करायला सुरुवात केली.
चाहत्यांनी का केला अक्षरावर हल्ला ?
मुळात अक्षराचं विमान उशीरा पोहोचल्यामुळे तिला कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचायलादेखील उशीर झाला. परिणामी, चाहत्यांमध्ये आधीच नाराजीचा सूर उमटला होता. यामध्येच तिच्यासोबत सेल्फी, फोटो घेण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ही गर्दी नियंत्रणाबाहेर केल्यामुळे इतक्या मोठ्या जमावावर नियंत्रण मिळवणं कठीण झालं होतं. परिणामी, चाहत्यांनी धक्काबुक्की करायला सुरुवात केली. या धक्काबुक्कीमुळे काही चाहते जखमी झाले. इतकंच नाही तर जे जखमी झाले त्या चाहत्यांनी रागाच्या भरात अक्षरावरच हल्ला चढवला. त्यांनी तिच्यावर दगड फेकायला सुरुवात केली. परंतु, घटनास्थळावर असलेल्या पोलिसांनी अक्षराला प्रोटेक्ट करत तिला कुठेही जखमी होऊ दिलं नाही.
दरम्यान, या हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाल्यामुळे त्यांच्यावर दाऊदनगर येथील शासकीय उपविभागीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकारानंतर अक्षरा सुखरुपपणे दाऊदनगरमधून बाहेर पडल्याचं सांगण्यात येतं.