Ajay Devgn and Tabu : अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) व अभिनेत्री तब्बू (Tabu) यांची ऑनस्क्रिन जोडी तर भारीच आहे. पण, खऱ्या आयुष्यातदेखील दोघांमध्ये खास नातं आहे. दोघेही खूप जुने मित्र आहेत. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से गाजलेले आहेत. असाच एक किस्सा सध्या चर्चेत आला आहे. नुकतंच एका मुलाखतीमध्ये तब्बूने अजयचा एक मजेशीर किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
तब्बू आणि अजय यांनी 'द लल्लनटॉप'ला मुलाखत दिली. यावेळी अजयचा वेगात कार चालवण्याबाबतचा एक किस्सा तब्बूने शेअर केला. एकदा भर रस्त्यात अजयने तब्बूची गाडी थांबवत ड्रायव्हरला गाडी हळू चालवण्यावरुन फटकारल्याचं तिनं सांगितलं. तब्बू म्हणाली, 'एके दिवशी त्याने माझी गाडी थांबवली आणि माझ्या ड्रायव्हरला विचारले, 'तु बैलगाडी चालवत आहेत का?' लवकर निघा. माझी गाडी मागे आहे'.
एवढंच नाही तर अजय हा आजही बदलला नसल्याचं तब्बूने सांगितलं. तब्बू म्हणाली, 'त्याकाळी अजय हा खूप वेगात गाडी चालवायचा. आताही तो फारसा बदललेला नाही. फक्त फरक एवढाचं की पूर्वी तो ओपन जीप चालवायचा, जी आता तो चालवत नाही. आता तो मला जेव्हा घरी सोडण्यासाठी विचारतो, तेव्हा मी घाबरते'. तर यावर स्वतःचा बचाव करत ही गोष्ट 25 वर्षांपूर्वीची असल्याचं अजयने म्हटलं.
अजय देवगण आणि तब्बू ही बॉलिवूडमधली ऑल टाईम सुपरहिट जोडी आहे. अजय आणि तब्बूने आतापर्यंत 'दृश्यम', 'दृश्यम २', 'गोलमाल अगेन', 'दे दे प्यार दे' अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. चाहत्यांना त्यांची जोडी ऑफ-स्क्रीन आणि ऑन-स्क्रीन दोन्ही आवडते. जेव्हा-जेव्हा अजय आणि तब्बू एका चित्रपटात एकत्र दिसतात, तेव्हा चाहत्यांची उत्सुकता द्विगुणित होते. सध्या ही जोडी त्यांच्या आगामी 'औरो में कहा दम था' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या दोघांचा हा दहावा चित्रपट आहे. या चित्रपटात त्यांची रोमँटिक लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. येत्या २ ऑगस्ट २०२४ ला हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.