अभिनेत्री अवनीत कौरने (Avneet Kaur) अगदी कमी वयात मनोरंजनसृष्टीत नाव कमावलं. तिचे लूक्स, फॅशनमुळे ती कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. मात्र आता तिच्याबाबत एक वेगळीच बातमी समोर आली आहे. अवनीतवर फसवणुकीचे आरोप लावण्यात आले आहेत. एका ज्वेलरी ब्रँडने तिच्यावर फसवणुकीचा आरोप लावला आहे. अभिनेत्री आणि ब्रँडमधील संवादाचे स्क्रीनशॉटही इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.
ज्वेलरी ब्रँडने आपल्या इन्स्टाग्रामवर लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या म्हणण्यांनुसार, अवनीतने त्यांच्याकडून युरोप व्हॅकेशनसाठी ज्वेलरी खरेदी केली होती. बार्टर कोलॅबोरेशन च्या अंतर्गत तिच्या स्टायलिस्टसोबत बातचीत झाली त्यानुसार अवनीतने ज्वेलरीच्या बदल्यात पोस्टमध्ये ब्रँडला टॅग करेल पण असं झालं नाही. ब्रँडने पोस्टसोबत स्क्रीनशॉट शेअर केला ज्यात स्टायलिस्टसोबत त्यांची बातचीत झाली आहे.अवनीतने पहिल्या पोस्टमध्ये ब्रँडला टॅग केलं नाही तर स्टायलिस्ट म्हणाली की ती दुसऱ्या पोस्टमध्ये करेल. पण तेही झालं नाही. मग ब्रँडने परत विचारलं तेव्हा अवनीत ज्वेलरीचे पैसे देईल असं स्टायलिस्टने सांगितलं. मात्र अवनीतने पैसेही दिले नाहीत आणि स्टोरीवर क्रेडिट देईल असं सांगितलं.
इतकंच नाही तर अवनीतने अनेकदा युरोपमध्ये ती ज्वेलरी घातली पण ब्रँडला टॅग केलं नाही. ब्रँडने ही पोस्ट करत स्पष्ट केले की आम्हाला अभिनेत्रीचं सत्य बाहेर आणायचं होतं. अद्याप अवनीतने यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र यामुळे सोशल मीडियावर नेटकरी तिला प्रचंड ट्रोल करत आहेत.