‘ऐ दिल है मुश्किल’चे शुक्लकाष्ट संपले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2016 8:10 PM
‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रदर्शनाचा मार्ग सुकर झाला आहे. निर्मात्यांच्या एका शिष्टमंडळाने गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतल्यावर या ...
‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रदर्शनाचा मार्ग सुकर झाला आहे. निर्मात्यांच्या एका शिष्टमंडळाने गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतल्यावर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला कोणतिही अडचण जाणार नाही. यासोबतच गरज असेल तेथे सुरक्षा दिली जाईल असे आश्वासन दिले. यामुळे अडचनीत सापडलेल्या ऐ दिल है मुुश्किलच्या प्रदर्शनाचा तिढा संपला असल्याचे मानले जात आहे. ‘सात जन्मातही पाकिस्तानी कलावंत बॉलिवूडमध्ये काम करू शकणार नाही’, असे मुकेश भट्ट यांनी या राजनाथ सिंग यांच्या भेटीनंतर माहिती देताना पत्रकारांना सांगितले. ‘द फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन गिल्ट आॅफ इंडिया लिमिटेड’चे सदस्य असलेल्या शिष्टमंडळाने राजनाथ सिंग यांनी भेट घेतली. यात ‘ऐ दिल है मुश्किल’चे निर्माते धर्मा प्रोडक्शन्सचे अपूर्व मेहता व फॉक्स स्टारचे विजय सिंह यांचा समावेश होता. ‘ऐ दिल है मुश्किल’चे प्रदर्शन सुरळीत व्हावे यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना चित्रपट प्रदर्शनाच्या वेळी कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे निर्देश दिले जातील असे आश्वासन राजनाथ सिंग यांनी दिल्याचे शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे निर्माते मुकेश भट्ट यांनी सांगितले. शिष्टमंडळाने चित्रपट निर्मात्यांची बाजू मांडली. उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाक कलावंताना बॉलिवूडमध्ये काम करू देण्यावरून वाद निर्माण झाला आहे. यावरून बॉलिवूडमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले. दरम्यान करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात पाकिस्तानी कलावंत फवाद खानची भूमिका असल्याने त्याचे प्रदर्शन करू देणार नसल्याचे सांगत मनसेने विरोध केला होता. यासोबतच सिंगल स्क्रिन थेअटर मालकांनी याच मुद्दयावरून ‘ऐ दिल है मुश्किल’चे प्रदर्शन करणार नाही असा निर्णय घेतला होता. करण जोहरने एका व्हिडीओपोस्ट द्वारे यानंतर पाक कलावंतांसोबत काम करणार नाही असे जाहीर केले. ‘ऐ दिल है मुश्किल’चे प्रदर्शन व्हावे यासाठी निर्मात्यांच्या संघटनेने पुढाकार घेतल्याने आता ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रदर्शनाचा मार्ग सोपा झाला असल्याचे दिसते. निर्माते आपला शब्द पाळतील का? आता असा मोठा सवाल या शिष्टमंडळाने दिलेल्या आश्वासनानंतर निर्माण झाला आहे. याचे उत्तर येणाºया काळातच मिळेल अशी आशा करूया!