खिलाडी, जो जीता वही सिकंदर, हिम्मतवाला, वक्त हमारा है, संग्राम अशा अनेक सिनेमात झळकलेली अभिनेत्री आयशा जुल्का आज बॉलिवूडमधून गायब झालीये. 90 च्या दशकात याच आयशाने मोठा पडदा गाजवला होता. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अदा... अ वे आॅफ लाइफ’ या सिनेमानंतर तिने मोठा ब्रेक घेतला. यानंतर 2018 साली तिने कमबॅक केला. पण तिच्या कमबॅकची फारसी कुणी दखलही घेतली नाही.अलीकडे एका मुलाखतीत आयशाने आपल्या या जुन्या दिवसांच्या आठवणी शेअर केल्या. सोबत पर्सनल लाइफबद्दलही काही खुलासे केलेत.
‘खूप लहान वयात मी चित्रपटांत काम करणे सुरु केले होते. लग्नानंतर मात्र मला एक सामान्य आयुष्य हवे होते. लग्नानंतर मी सिनेमांत काम न करण्याचा निर्णय घेतला. माझ्यामते, तो अगदी योग्य निर्णय होता,’असे तिने यावेळी सांगितले.आज आयशा 48 वर्षांची आहे. पतीसोबत आनंदात संसार करतेय. मात्र अद्याप तिला एकही मूल नाही. याबद्दलही ती बोलली. मला मूल नको होते. मी जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला होता. माझा हा निर्णय कुटुंबानेही मान्य केला. पतीनेही मला समजून घेतले. माझा पती समीर एक समजूतदार व्यक्ति आहे. आता माझा बराच वेळ आणि माझी शक्ती मी सोशल कामात घालवते, असे तिने सांगितले.
आजही होतो पश्चाताप...
लग्नानंतर बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाचा आयशाला मुळीच पश्चाताप नाही. मात्र करिअरदरम्यान काही सिनेमे नाकारल्याचा पश्चाताप तिला आजही होतो. तिने सांगितले, मणिरत्नम यांचा ‘रोजा’ हा सिनेमा बिझी शेड्यूलमुळे मी नाकारला होता. मला आजही त्याची खंत वाटते. रामा नायडूंचा ‘प्रेम कैदी’ हा सिनेमा मी नाकारला. कारण यात मी बिकिनी सीन्स द्यावेत, अशी मेकर्सची इच्छा होती.
2003 मध्ये आयशाने कंस्ट्रक्शन टायकून समीर वाशीसोबत लग्न केले. आता आयशा स्वत:ही एक यशस्वी बिझनेस वूमन बनली आहे.
पतीसोबत कंस्ट्रक्शन, स्पा आणि स्वत:ची क्लोदिंग लाईन असा सगळा व्याप आयशा सांभाळते. अलीकडे एका मुलाखतीत आयशा याबद्दल बोलली होती. मी सध्या सॅमरॉक या कंपनीच्या कामात बिझी आहे. मी आणि माझ्या पतीने ही कंपनी उघडली असल्याचे तिने सांगितले होते. या सर्व बिझनेसचा व्याप अब्जावधीच्या घरात आहे.