आपल्या स्वकतृत्वावर सिनेसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे आयेशा झुल्का(ayesha jhulka) . वयाच्या १५ व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळे एकेकाळी तिला आपल्या सिनेमात घेण्यासाठी अनेक दिग्दर्शक, निर्माते तिच्या घरासमोर रांग लावत होते. मात्र, एका दिग्दर्शकाने तिची दिशाभूल करत तिचा न्यूड सीन सिनेमात दाखवला.ज्यानंतर तिच्या करिअरवर त्याचा गंभीर परिणाम झाला.करिअरच्या शिखरावर असताना आयेशा यांनी अचानकपणे कलाविश्वातून एक्झिट घेतली. त्यानंतर त्या फारशा कोणत्याच सिनेमात दिसल्या नाहीत. याविषयी एका मुलाखतीत त्यांनी भाष्य केलं. इतकंच नाही तर एका दिग्दर्शकाने फसवल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या करिअरवर झाला असंही सांगितलं.
'दलाल' या सिनेमात आयेशा झळकल्या होत्या. परंतु, या सिनेमात असलेले सीन्स आणि कपडे यांच्यावर आक्षेप घेत आयेशा यांच्या आईने या सिनेमात तिला काम करण्यास मनाई केली होती. मात्र, या सिनेमात आयेशाच्या विरोधात काहीही होणार नाही असा शब्द दिग्दर्शकांनी त्यांना दिला होता. या सिनेमात राज बब्बर आणि मिथुन चक्रवर्ती मुख्य भूमिकेत होते. तर, शक्ती कपूर यांनी खलनायिकी भूमिका साकारली होती.
या सिनेमात आयेशा यांचा एक न्यूड सीन दाखवण्यात येणार होता. हा सीन बॉडी डबल करणार होती. परंतु, हा सीन सिनेमात नसावा असं आयेशा यांचं म्हणणं होतं. त्यामुळे या सीनविषयी कळताच त्या रागात दिग्दर्शकांकडे गेल्या. यावेळी दिग्दर्शक प्रकाश मेहरा आणि पार्थो घोष यांनी आयेशाला पुन्हा शब्द दिला की सिनेमात असं काही नसेल. इतकंच नाही तर प्रकाश मेहरांच्या पत्नीनेदेखील आयेशाची समजूत काढली होती. मात्र, सिनेमा रिलीज झाल्यानंतर हा सीन तसाच ठेवण्यात आला होता. ज्यामुळे आयेशाच्या इमेजला धक्का लागला.
चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा आयेशा यांच्या पायाखालची जमीन सरकली. सिनेमात न्यूड सीन होता. हा सीन आयेशाने शूट केला नसला तरी प्रेक्षकांसाठी ती आयेशाच होती. हा सीन पाहिल्यानंतर तिने दिग्दर्शकांना याविषयी जाब विचारला. त्यावर, त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने शब्द फिरवले. त्यांनी सिनेमा साइन करतानाचा करार दाखवला. त्यात म्हटलं गेलं होतं की, एखाद्या सीनमध्ये बदल करण्याचा दिग्दर्शकाला पूर्ण अधिकार असून कलाकार त्याला सहकार्य करतील.
दरम्यान, या सगळ्या प्रकारामध्ये आपली फसवणूक झाल्याचं आयेशाच्या लक्षात आलं आणि त्यानंतर तिने कधीही प्रकाश मेहरासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्या एका सीननंतर तिच्या करिअरवर मोठा परिणाम झाला, असंही तिने सांगितलं.