जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात करोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. या दरम्यान सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत.
या कोरोना संकटाशी लढण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परिने आर्थिक मदत करत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी पुढे येत पंतप्रधान सहाय्यक निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीत मदत केली आहे. तसेच या लॉकडाऊनमुळे अनेकांना दोन वेळेचे जेवण देखील मिळत नाहीये. काही कलाकार या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करत आहेत तर काही जण लोकांना आर्थिक मदत करत आहेत. आता एका अभिनेत्रीचा नवरा मदत करण्यासाठी पुढे आला आहे.
सलमानची वाँटेड या चित्रपटातील नायिका आयशा टाकियाचा नवरा फरहान आजमीने बीएमसीला त्याचे एक हॉटेल मुंबई पोलिसांना वापण्यासाठी दिले आहे. फरहाननेच सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझे गल्फ हॉटेल नेहमीच संकटामध्ये लोकांच्या मदतीस धावून आलेले आहे. १९९३ ला झालेल्या दंगलीच्यावेळी धारावी, प्रतीक्षा नगर या परिसरातील लोक येथे थांबले होते. आज कोरोनाच्यावेळी हे हॉटेल आपल्यासाठी काम करणाऱ्या पोलिसांच्या कामी येत आहे.
फरहानचे हॉटेल कुलाबामध्ये असून त्याच्या या मदतीचे सगळेच जण कौतुक करत आहेत. फरहानने गरजूंना घरातील उपयोगात येणाऱ्या वस्तूंचे देखील वाटप केले आहे. फहरान आणि आयशा यांचे लग्न २००९ मध्ये झाले असून लग्नानंतर आयशाने अभिनयक्षेत्राला रामराम ठोकला.