आजच्या घडीला इंडस्ट्रीमधील दोन सर्वात मोठ्या सर्जनशील व्यक्ती एकत्र आल्या आहेत, असेच म्हणावे लागेल. रॉक ऑन!!, काय पो छे, केदारनाथ यासारख्या यशस्वी सिनेमांचा दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि भारतीय सिनेमांचा पोस्टर बॉय समजला जाणारा आयुष्यमान खुराना हे दोघे पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. तुमच्या मनाला स्पर्शून जाईल अशी पुरोगामी प्रेम कथा या नव्या सिनेमात मांडली जाणार आहे. अद्याप नाव न ठरलेल्या या सिनेमाची कथा उत्तर भारतात घडते आणि साधारण ऑक्टोबरमध्ये या सिनेमाचं काम सुरू होईल.अभिषेक म्हणाला, "आयुष्यमान आणि मी आम्ही दोघेही एका विशिष्ट प्रकारच्या सिनेमांसाठी ओळखले जातो. हा सिनेमा नक्कीच आम्हा दोघांसाठी फार खास आहे. प्रेक्षकांनी पुन्हा चित्रपटगृहांमध्ये येऊन एक समुदाय म्हणून सिनेमे पहावेत असे आम्हाला वाटते आणि त्यासाठी आम्ही शक्य ते सगळे प्रयत्न करणार आहोत. या सिनेमासाठी उत्कृष्ट काम आम्ही करणार आहोत."
हा दिग्दर्शक म्हणाला की तो आयुष्यमानला आजवर कधीही पाहिलेला नाही अशा रुपात सादर करणार आहे. अभिषेक म्हणाला, "या सिनेमात आयुष्यमान क्रॉस फंक्शनल अॅथलेटची भूमिका साकारणार आहे आणि त्यासाठी त्याला काही शारीरिक बदल करावे लागतील जे त्याने आजवर कधीही केलेलं नाही. हे एक आव्हान आहे आणि तो फार मनापासून हे करतोय."
अभिषेकसोबत अशा कल्पक आणि सर्जनशील सिनेमासाठी काम करण्यास आयुष्यमान उत्सुक आहे आणि आपल्यातील शारीरिक बदलांसाठीही तो तयार आहे. "आजघडीच्या सिनेमात अभिषेकची एक वेगळी, खास ओळख आहे आणि मला अत्यंत प्रिय अशा या सिनेमाच्या निमित्ताने आम्हाला अखेर एकत्र काम करण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद आहे. प्रेक्षकांना विविध भावनांच्या हिंदोळ्यावर नेण्यासाठीचं सगळं काही या सिनेमात आहे आणि हा सिनेमा संपूर्ण कुटुंबासाठी एक मनोरंजक सिनेमा असणार आहे. ही एक सुंदर, पुरोगामी प्रेमकथा आहे जी तुमच्या मनाला स्पर्शून जाईल," असे तो म्हणाला.
'आयुष्यमान खुराना शैली' असा एक नवा प्रकारच हिंदी सिनेमात जन्माला घालणारे अनेक सिनेमे आयुष्यमानने केले आहेत. तो म्हणाला, "या सिनेमासाठी मला जे शारीरिक बदल करायचे आहेत त्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. मी एका संपूर्णपणे नव्या लुकमध्ये दिसणार आहे. मी पडद्यावर याआधी असा कधीच दिसलो नव्हतो आणि प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद असेल, हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. ही संपूर्ण प्रक्रिया माझ्यासाठी काहीशी दमछाक करणारी, आतून हलवून काढणारी आहे पण मला वाटतं ही वेदना बरंच काही देऊन जाईल." पुढील वर्षी जगभरात हा सिनेमा प्रदर्शित होईल.