बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची चलती आहे. महेंद्रसिंह धोनी, संजू,असे काही बायोपिक मागील काळात येऊन गेले. आता चर्चा आहे ती क्रिकेटर सौरव गांगुलीवरील बायोपिकची. क्रिकेटचा 'दादा' सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) भूमिका कोण साकारणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) दादाच्या भूमिकेत दिसणार अशी चर्चा होती मात्र आता दुसऱ्याच अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीवर लवकरच बायोपिक बनणार आहे. बायोपिकच्या स्क्रिप्टचे काम पूर्ण झाले आहे. तर सध्या कास्टिंगवर चर्चा सुरु आहे. सौरव गांगुलीची भूमिका कोण साकारणार यावर संभ्रम होता. रणबीर कपूरचं नाव काही दिवसांपूर्वी बरंच चर्चेत होतं. पण आता अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushman khurana) ही भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. त्याच्यासोबतची बोलणी अंतिम टप्प्यात आल्याचं पीपिंग मून च्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. यासोबतच बायोपिकच्या दिग्दर्शनाची जबाबदारी रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या सांभाळेल अशी चर्चा आहे.
सौरव गांगुलीच्या बायोपिकविषयी लव्ह फिल्म्सची आयुष्मान खुरानासोबतची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. मेकर्स अनेक महिन्यांपासून या विषयावर चर्चा करत आहे. तर आता अधिकृतरित्या फॉर्मॅलिटी बाकी आहेत. आयुष्मान डावखुऱ्या बॅट्समन सौरव गांगुलीची भूमिका उत्तम पार पडेल असा मेकर्सला विश्वास आहे.
रिपोर्टमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, आयुष्मान येत्या काही दिवसात सौरव गांगुलीची वैयक्तिक भेट घेईल. तसंच शूटिंग सुरु होण्याआधी आयुष्मानला काही महिने क्रिकेटचे बेसिक प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. 'तू झुठी मै मक्कार' सिनेमानंतर लव्ह रंजन सौरव गांगुलीच्या बायोपिकची घोषणा करतील अशी चर्चा होती. तसंच रणबीर कपूर गांगुलीची भूमिका साकारेल असंही बोललं गेलं. मात्र आता आयुष्मान खुरानाची बायोपिकमध्ये वर्णी लागली आहे.