'डॉक्टर जी' जंगली पिक्चर्स प्रोडक्शनचा चित्रपट असून त्यामध्ये आयुषमान खुराना, रकुल प्रीत सिंह आणि शेफाली शाह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकतीच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, निर्मात्यांनी आज आयुषमानचा बहुप्रतीक्षित 'फर्स्ट लुक' सादर केला आहे, जो या कौटुंबिक मनोरंजक चित्रपटात डॉक्टरची भूमिका निभावणार आहे.
'डॉक्टर जी'मध्ये डॉ उदय गुप्ताची व्यक्तिरेखा साकारत, आयुषमान खुराना ने नुकत्याच सुरू झालेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत उत्सुकता व्यक्त केली. तो म्हणाला की, "'डॉक्टर जी'चा विषय माझ्या खूप जवळचा आहे. लॉकडाउनच्या सर्व नियमांचे पालन करत, आम्ही सर्वजण चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्याची वाट बघत होतो, आणि आम्हाला याचा आनंद आहे की अखेरीस तो दिवस उगवला."
आयुषमान पुढे म्हणाला की, "स्क्रीनवर पहिल्यांदाच एका डॉक्टरची व्यक्तिरेखा साकारणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी चित्रीकरणासाठी खरोखरच खूप उत्साहित आहे, कारण यामुळे मला पुन्हा एकदा विद्यार्थी होण्याची आणि होस्टेल लाइफ जगण्याची आणि त्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळणार आहे.
'बरेली की बर्फी' आणि 'बधाई हो' सारख्या दोन यशस्वी चित्रपटांनंतर 'डॉक्टर जी' हा जंगली पिक्चर्ससोबत आयुषमानचा तीसरा चित्रपट आहे. आयुषमान आणि रकुल पहिल्यांदाच 'डॉक्टर जी'च्या निमित्ताने एकत्र येत आहेत. अनुभूति कश्यपद्वारे दिग्दर्शित हा चित्रपट सुमित सक्सेना, विशाल वाघ आणि सौरभ यांच्याद्वारे लिहिण्यात आलेला एक कॅम्पस कॉमेडी ड्रामा आहे, ज्यामध्ये मुख्य पात्र डॉक्टरांच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.