आयुष्यमान खुराणा सध्या ‘ड्रिम गर्ल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखला जाणा-या आयुष्यमानने गत 15 वर्षांत इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली. 2004 मध्ये एमटीव्ही रोडिजचे सीझन 2 जिंकले. हाच ‘रोडिज’ एक दिवस बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता बनेल, असा विचार त्यावेळी कुणी केला नव्हता.या शोनंतर आयुष्यमानच्या लूकमध्ये अनेक बदल झालेत. त्याच्यातील हे बदल थक्क करणारे आहेत. आयुष्यमान हा मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स आहे. चित्रपटात येण्यापूर्वी पाच वर्षे तो थिएटर करत होता.
अनेक दिवस रेडिओ जॉकी म्हणूनही त्याने काम केले. बिग एफएमवर ‘बिग चाय, मान ना मान मैं तेरा आयुष्यमान’ नावाचा रेडिओ शो त्याने होस्ट केला होता. बॉलीवूड मध्ये येण्यापूर्वी तो टीव्ही शो होस्ट करायचा. छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय व प्रसिद्ध अँकर अशी त्याची ओळख होती.
२०१२ मध्ये त्याला ‘विकी डोनर’ चित्रपट मिळाला. या चित्रपटाची खूप चर्चा झाली. ‘विकी डोनर’ या चित्रपटात आयुष्यमानने स्पर्म डोनरची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याला फिल्म फेयर चा पुरस्कार प्राप्त झाला होता. यानंतर नौटंकीसाला, बेवकूफियां, हवाईजादा हे चित्रपट त्याने केलेत. २०१५ यावर्षी आलेला त्याचा ‘दम लगा के हईशा’ चित्रपट हिट झाला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
आयुष्मान एक चांगला गायक आणि गीतकारही आहे. ‘विकी डोनर’मधील ‘पानी दा रंग’ हे गाणे आयुष्यमानने स्वत: लिहिले होते, शिवाय स्वत:च ते गायले होते.दोन वर्षांत बरेकी बर्फी, शुभ मंगल सावधान, बधाई हो आणि अंधाधुन असे एकापाठोपाठ चार हिट दिल्यानंतर आज आयुष्यमान बॉलिवूडचा ए लिस्ट स्टार बनला आहे.