बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचे लग्न निपटले. आता दीपिका आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये परतण्यास तयार आहे. लग्नानंतरचा दीपिकाचा पहिला अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी हिच्या आयुष्यावर बेतलेला आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात दीपिका एका दमदार व आव्हानात्मक भूमिकेत दिसेल. सूत्रांचे मानाल तर लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. पण त्याआधी निर्मात्यांना एका वेगळ्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. होय, डीएनएच्या वृत्तानुसार, या चित्रपटात मेकर्सला दीपिकाच्या तोडीचा दमदार अॅक्टर हवा आहे. मेर्कर्सच्या डोक्यात या भूमिकेसाठी दोन नावे आहेत. एक म्हणजे, राजकुमार राव आणि दुसरे म्हणजे आयुष्यमान खुराणा. दोघेही एकमेकांपेक्षा तसूभरही कमी नाहीत. त्यामुळे या दोघांपैकी कुणाला साईन करावे, असा प्रश्न मेकर्सला पडला आहे.
२०१८ हे वर्ष आयुष्यमान आणि राजकुमार दोघांसाठीही शानदार राहिले. यावर्षी आयुष्यमानने ‘अंधाधून’ व ‘बधाई हो’ सारखे सुपरहिट चित्रपट दिलेत. तर राजकुमार रावचा ‘स्त्री’ हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरला. त्यामुळे दोघांमध्येही फाईट आहे. आता या फाईटमध्ये दीपिकाचा हिरो म्हणून कोण निवडला जातो, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.मेघना गुलजार ‘राजी’,‘ तलवार’ अशा दमदार चित्रपटांसाठी ओळखली जाते. मेघनाच्या ‘राजी’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि विकी कौशल दिसले होते. मेघनाचा हा चित्रपट समीक्षक व प्रेक्षक दोघांनीही डोक्यावर घेतला होता. ‘राजी’नंतर मेघना अॅसिड हल्ल्यासारख्या संवेदनशील मुद्यावर चित्रपट घेऊन येतेय. यात दीपिकाचीी व्यक्तिरेखा अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी हिच्यापासून प्रेरित असेल.