बॉलिवूडमधील अतिशय हँडसम, फिटनेस फिक्र अभिनेता म्हणजे आयुषमान खुराणा (Ayushmann Khurrana). आयुषमान हा त्याच्या अभिनयासोबतच अप्रतिम फिटनेससाठी ओळखला जातो. रील लाइफ असो की रिअल लाईफ, दोन्ही ठिकाणी त्याचा फिटनेस पाहायला मिळतो. तो त्याच्या आहाराचीही विशेष काळजी घेतो हेही तितकेच खरे आहे. आता आयुषमान खुराणावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयुषमान हा पंतप्रधान मोदींच्या खास 'फिट इंडिया मूव्हमेंटचा' भाग बनला आहे.
आयुषमान खुराणा याला 'फिट इंडिया आयकॉन' बनवण्यात आलं आहे. नवी दिल्लीतील फिट इंडिया मुव्हमेंट कार्यक्रमात केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही घोषणा केली. 'फिट इंडिया मूव्हमेंटचा' चा उद्देश भारतातील नागरिकांना त्यांच्या आरोग्यास प्राधान्य देण्यास प्रवृत्त करणे आणि फिटनेस जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग बनवणे आहे.
अभिनेत्यानं देशातील लाखो लोकांना फिटनेस स्वीकारण्यासाठी प्रेरित करण्याचा निर्धार केला आहे. आयुष्मान म्हणाला "जेव्हा तुमचे आरोग्य चांगले असते, तेव्हा जीवनातील कोणतीही समस्या व्यक्तिगत असो वा व्यावसायिक सहज वाटते. पण जेव्हा आरोग्य खालावतं, तेव्हा तेच सर्वात मोठं आव्हान बनतं. चांगले आरोग्य आपल्याला कोणतीही गोष्ट करण्यास सक्षम बनवते. एक निरोगी व्यक्ती सक्षम, आत्मविश्वासू आणि खंबीर असतो, जरी जग त्याच्या भोवती अस्थिर वाटत असले तरी. आरोग्य हेच खरे धन आहे".
पुढे तो म्हणाला, "एक निरोगी राष्ट्रच समृद्ध राष्ट्र असते. जेव्हा आपण आरोग्यदायी असतो, तेव्हा आपण अधिक उत्पादक, समृद्ध आणि देशाच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरतो. मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे या अद्भुत उपक्रमासाठी मनःपूर्वक आभार मानतो. तसेच, केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख भाई यांचेही आभार, ज्यांनी या राष्ट्रीय मोहिमेसाठी नवनवीन कल्पनांचा अवलंब केला. 'फिट इंडिया आयकॉन' हा सन्मान मिळाल्याचा मला अभिमान वाटतो. शेवटी, मी युवा पिढी आणि आपल्या महान देशासाठी एक शुभेच्छा देऊ इच्छितो दीर्घायुष्याचा आशीर्वाद 'आयुष्मान भव!'.
केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया म्हणाले "जेव्हा तुमच्यासारखे सेलिब्रिटी या व्यासपीठावर येतात आणि फिट इंडिया बद्दल सकारात्मक संदेश देतात, तेव्हा तुमच्या शब्दांमुळे अनेक तरुण प्रेरित होतील आणि फिट इंडिया मोहिमेत सहभागी होतील. मला खात्री आहे की तुम्ही दिलेली प्रेरणा भारताला विकसित राष्ट्र बनविण्यास मदत करेल आणि तुम्ही तुमची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली आहे"