आयुष्यमान खुराणा व नुसरत भरूचा यांचा ‘ड्रीम गर्ल’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धूम करतोय. 100 कोटींकडे या चित्रपटाची वाटचाल सुरु आहे. अशात या चित्रपटाचे एक गाणे वादात सापडले आहे. होय, ‘ड्रीम गर्ल’मधील ‘ढगाला लागली कळ... ’ या रिमिक्स गाण्यावरून वाद उफाळून आला आहे. चित्रपटातील हे गाणे कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप होत आहे. या आरोपानंतर डिजीटल प्लॅटफॉर्मवरून हे गाणे हटवण्यात आले आहे. ‘ड्रिम गर्ल’ या सिनेमासाठी मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार दादा कोंडके यांच्या सुपरहिट ‘ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं’ या गाण्याचे रिमिक्स करण्यात आले आहे. यामध्ये आयुष्मान आणि अभिनेत्री नुसरत भारुचा यांनी जबरदस्त डान्स केला आहे. सारेगामा इंडियाने कोर्टात या रिमिक्स गाण्याविरोधात एक याचिका दाखल केली होती. सारेगामा इंडियाकडे या ओरिजनल गाण्याचे राईट्स आहेत.
यावर सुनावणी करताना ‘ड्रिम गर्ल’मधील हे रिमिक्स गाणे संपूर्ण डिजीटल प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे आदेश दिलेत. अर्थात हे एक प्रमोशनल सॉन्ग असल्याने ‘ड्रिम गर्ल’वर याचा काहीही परिणाम झालेला नाही. या गाण्यावर आयुष्यमान खुराणा, नुसरत आणि रितेश देशमुख थिरकताना दिसले होते.