एकेकाळी 'अंधाधुन', 'विकी डोनर', 'बधाई हो' असे सुपरहिट सिनेमा देणारा अभिनेता म्हणजे आयुषमान खुराना (Ayushman Khurana). सध्या तो 'ड्रीम गर्ल 2' (Dream Girl 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. २५ ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला असून सिनेमा रिलीज होण्यापूर्वी त्याची प्रचंड चर्चा रंगली होती. मात्र, ज्यावेळी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये धडकला, त्यावेळी तो प्रेक्षकांवर फारशी जादू करु शकलेला नाही. त्यामुळे आयुषमानच्या करिअरचा एकंदरीत विचार केल्यास, गेल्या काही वर्षांमध्ये त्याचे एकामागून एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल फ्लॉप ठरले आहेत. त्यामुळे एकेकाळी हिट असलेला हा अभिनेता आता अवघ्या काही वर्षांमध्येच फ्लॉप अभिनेत्यांच्या लिस्टमध्ये जात असल्याचं दिसून येत आहे.
२००२ मध्ये आयुषमानने त्याच्या करिअरची सुरुवात केली. सुरुवातीला काही रिॲलिटी शोमध्ये काम केल्यानंतर त्याला २०१२ मध्ये पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली. शूजित सरकार दिग्दर्शित 'विक्की डोनर' या सिनेमातून विकीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. विशेष म्हणजे विकीचा हा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. त्यामुळे त्याच्याकडे अनेक सिनेमांच्या रांगा लागल्या होत्या. परंतु, २०२१ पासून त्याच्या करिअरला उतरती कळा लागली. 'चंदीगढ करे आशिकी' या सिनेमापासून ते आतापर्यंत त्याचे अनेक सिनेमे लागोपाठ फ्लॉप झाले आहेत. त्यामुळे आयुषमान येत्या काळात कितपत प्रभाव पाडेल, याबद्दल शंका वाटू लागली आहे.
आयुषमानचे फ्लॉप झालेले चित्रपट
'बेवकुफिया', 'हवाईजादा', 'मेरी प्यारी बिंदू', 'चंदीगढ करे आशिकी', 'अनेक', 'डॉक्टर जी', 'ॲन ॲक्शन हिरो' हे आयुषमानचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरले आहेत. तर, 'नौटंकी साला', 'बरेली की बर्फी', 'शुभमंगल सावधान' या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर किरकोळ गल्ला जमवला आहे.