विकी कौशलचा भूत पार्ट १ : द हाँटेड शिप आणि आयुष्मान खुराणाचा शुभ मंगल ज्यादा सावधान हे दोन्ही चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांचा जॉनर पूर्णपणे वेगळा असून या दोन्ही चित्रपटांच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या दोन्ही चित्रपटांचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून हे चित्रपट कधी प्रदर्शित होतील याची प्रेक्षक वाट पाहात होते. गेल्या काही महिन्यात विकी आणि आयुष्मान या दोघांनीही सतत हिट चित्रपट दिले असल्याने या दोघांकडून देखील सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पण या दोन्ही चित्रपटांमध्ये सध्या तरी आयुष्मानच्या शुभ मंगल ज्यादा सावधान या चित्रपटाने बाजी मारली आहे. भूत पार्ट १ : द हाँटेड शिपच्या तुलनेत या चित्रपटाने पहिल्या दिवशी जास्त कलेक्शन केले आहे.
भूत पार्ट १ : द हाँटेड शिप आणि शुभ मंगल ज्यादा सावधान या दोन्ही चित्रपटांनी किती कलेक्शन केले याबाबत दोघांच्याही फॅन्सना उत्सुकता लागली आहे. शुभ मंगल ज्यादा सावधान या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 9.25 ते 9.50 कोटी इतके कलेक्शन केले आहे. आयुष्मानच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत पहिल्या दिवशीचे हे कलेक्शन कमी आहे. कारण आयुष्मानच्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ड्रीम गर्ल या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 10 कोटी 5 लाख इतकी कमाई केली होती.
शुभ मंगल ज्यादा सावधान या चित्रपटाचे बजेट 50 कोटी असून हा चित्रपट भारतात 2500 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबतच जितेंद्र कुमार, गजराज राव, नीना गुप्ता, मनु ऋषि चड्ढा, सुनीता, मानवी यांच्या मुख्य भूमिका आहेत. समलैंगिकता या कॉन्सेप्टवर हा चित्रपट आधारित असून एक वेगळा मुद्दा या चित्रपटाद्वारे मांडण्याचा दिग्दर्शकाने प्रयत्न केला आहे.
भूत पार्ट १ : द हाँटेड शिप या चित्रपटाने पहिल्या दिवशी 5.25 कोटी इतकी कमाई केली असून या हॉरर चित्रपटात विकीसोबतच भूमी पेडणेकर, आशुतोष राणा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन भानू प्रताप सिंगने केले असून दिग्दर्शन करण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. या चित्रपटाचे बजेट 30 कोटी असून हा चित्रपट भारतात 2000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.
सध्या शुभ मंगल ज्यादा सावधानने बाजी मारली असली तरी विकेंडला कोणत्या चित्रपटाकडे प्रेक्षक अधिक वळतात यावर दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर कोण किंग ठरतेय हे कळेल.