बॉलिवूडमध्ये देखील आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बेबी डॉल या गाण्यामुळे नावारूपाला आलेली गायिका कनिका कपूरने कोरोनाची टेस्ट केली असून तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याचे वृत्त एबीपी न्यूजने दिले आहे. कनिका सध्या लखनऊमध्ये असून तिला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
कनिका नुकतीच लंडनहून परतली असून ती तिच्या कुटुंबियांसोबत लखनऊ येथे राहात होती. तिने काहीच दिवसांपूर्वी एक डिनर पार्टी दिली असून या डिनर पार्टीला १०० लोक उपस्थित होते असे म्हटले जातेय. कनिकाकडून अथवा तिच्या जवळच्या कोणत्याही माणसांकडून अद्याप या बातमीला दुजोरा मिळालेला नाहीये.
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. ऑफिसेसमध्ये देखील अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे. लोकांनी घरातून कमीत कमी बाहेर पडावे. गरज असेल तरच सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय वापरावा असे सरकार गेल्या काही दिवसांपासून मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगत आहे.
कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून बुधवारी या साथीला महारोगराई घोषित करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.