‘बचपन का प्यार’ या गाण्यामुळे एका रात्रीत स्टार झालेला सहदेव दिरदो (Sahdev Dirdo Road Accident) मंगळवारी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला. स्कुटीवरुन ट्रीपल सीट प्रवास करत असताना त्याच्या गाडीला अपघात झाला आणि त्यामध्ये हेल्मेट न घातल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर अनेक तास सहदेव बेशुद्धावस्थेत होता. तूर्तास तो शुद्धीवर आला असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे कळतेय. (Sahdev Dirdo Health Update)
सर्वप्रथम सहदेवला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यास जगदलपूर येथील खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आले. उपचार सुरू होईपर्यंत 5 तास सहदेव बेशुद्ध होता. रात्री 10 च्या सुमारास तो शुद्धीवर आला. त्याच्या डोक्याला पाच टाके पडले आहेत. तथापि तो धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, सहदेव आता बोलू शकतो. त्याचा सीटी स्कॅन व अन्य टेस्ट करण्यात आल्या आहेत. प्रकृती सुधारत असल्याने त्याला रायपूर वा विशाखापट्टनमला हलवण्याची गरज नाही. रॅपर बादशहाने (Badshah) ट्विट करुन सहदेवच्या अपघाताची माहिती दिली होती. तसेच, सहदेवसाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही बादशहाने केले होते. मी सहदेवच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी असल्याचेही बादशहाने म्हटले होते.
सहदेव आपल्या मित्रांसमवेत शबरी नगरीकडे जात होता. त्याचवेळी, वाळू आणि मातीतून त्याची गाडी स्लीप झाली. त्यामध्ये, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर, स्थानिकांनी त्यास जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, ‘बचपन का प्यार’ या गाण्यामुळे सहदेव सोशल मीडिया सेन्सेशन बनला होता. प्रसिद्ध गायक बादशहानेही सहदेवसोबत ‘बचपन का प्यार’ हे गाणे गायले होते.